
इंग्लडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला लागलेले दुखापतीचे ग्रहण सुटता सुटेनासे झाले आहे. त्याला आता दीर्घ रजेवर जावे लागत असल्यामुळे आता आयपीएलपाठोपाठ अॅशेस मालिकेतूनही बाहेर पडला आहे.
पुढील महिन्यात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अॅशेस मालिकेचा थरार रंगणार आहे. मात्र, आर्चर दुखापतग्रस्त असल्याने इंग्लंड संघासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून आर्चरला पाठीच्या दुखापतीने ग्रासले आहे. यंदाच्या आयपीएल मोसमातही आर्चर चांगली कामगिरी करू शकला नाही. आर्चर केवळ पाच सामनेच खेळला. त्यामध्ये त्याला केवळ दोन विकेट मिळवता आले. आर्चर आयपीएलच्या अर्धवट सोडून गेल्या आठवड्यात मायदेशी परतला होता.
लॉर्डस्वर १ ते ४ जून या कालावधीत इंग्लंड आयर्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्याच्या संघाची घोषणा करताना इंग्लंड क्रिकेट बोर्डाने आर्चरच्या दुखापतीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोपराच्या दुखापतीमुळे आर्चर त्रस्त असून, तो विश्रांती घेत आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी आम्ही त्याला शुभेच्छा देत असून, आम्हाला खात्री आहे की, तो लवकर पुनरागमन करेल, अशी माहिती इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली आहे. इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार बेन स्टोक्स देखील आयपीएलच्या अंतिम टप्प्याला मुकणार आहे. अॅशेस मालिकेसाठी इंग्लिश कर्णधार मायदेशी पतरणार असल्याचे समजते.
आयर्लंडविरूद्धच्या कसोटीसाठी इंग्लंडचा संघ : बेन स्टोक्स (कर्णधार), जेम्स अँडरसन, जोनाथन बेअरस्टो, स्टुअर्ट ब्रॉड, हॅरी ब्रूक, झॅक क्रॉली, बेन डकेट, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, ऑली पोप, मॅथ्यू पॉट्स, ऑली रॉबिन्सन, जो रूट, ख्रिस वोक्स, मार्क वुड.
अॅशेस मालिकेचे वेळापत्रक :
पहिला सामना – 16 ते 20 जून; दुसरा सामना – 28 ते 2 जुलै; तिसरा सामना – 6 ते 10 जुलै; चौथा सामना – 19 ते 23 जुलै; पाचवा सामना – 27 ते 31 जुलै.
























































