
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले जोगेश्वरीतील एसआरए प्रकल्प लवकरच मार्गी लागणार आहेत. जोगेश्वरी येथील 16 एसआरए प्रकल्प अर्धवट अवस्थेत आहे. या प्रकल्पांविषयी आमदार रवींद्र वायकर यांनी एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश लोखंडे यांच्यासोबत नुकतीच चर्चा करून प्रकल्प पूर्ण होण्यास येणाऱया अडचणी दूर करण्याच्या सूचना दिल्या.
जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील मेघवाडी, शिवटेकडी, मजासगाव, रामवाडी व दत्तटेकडी, इंदिरा नगर, हरिनगर-शिवाजीनगर आदी एसआरए प्रकल्पांची कामे गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेली आहेत. या प्रकल्पांच्या प्रश्नांबाबत आमदार रवींद्र वायकर यांनी सतीश लोखंडे यांच्याशी चर्चा केली. यावेळी माजी नगरसेवक बाळा नर, प्रवीण शिंदे, विधानसभा समन्वयक भाई मिर्लेकर, बावा साळवी, उपविभागप्रमुख बाळा साटम, जयवंत लाड, जितेंद्र वळवी, कैलाशनाथ पाठक, शाखाप्रमुख, बाळा तावडे, नितेश म्हात्रे, प्रदीप गांधी, नंदू ताम्हणकर तसेच रहिवासी उपस्थित होते.
हरिनगर- शिवाजीनगर प्रकल्पात घुसखोरी
हरीनगर-शिवाजीनगर एसआरए प्रकल्पातील इमारती अतिशय निकृष्ट दर्जाच्या बांधण्यात आल्या आहेत. ज्या पात्र लोकांना घरे मिळाली पाहिजे होती त्यांना ती न मिळता यात घुसखोराचे प्रमाण वाढले आहे ही बाब आमदार वायकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या निदर्शनास आणली. तसेच घुसखोरांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली. या संपूर्ण प्रकल्पाची एसआरचे सचिव यांच्या मार्फत महिनाभरात चौकशी करून घुसखोरांना बाहेर काढण्याचे निर्देश एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिले.
मेघवाडी झोपडपट्टी ज्या जागेवर वसली आही ती अगादर स्लम म्हणून घोषित करण्यात आली आहे. त्यामुळे एसआरएने 3 (सी) च्या नियमानुसार मालकाला नोटीस बजावावी, तीन महिन्यांचा कालावधी द्यावा. या तीन महिन्यांत मालकाने झोपडपट्टी विकास करण्याबाबत कुठलीच भूमिका घेतली नाही तर शासनाने ही जागा ऍक्वायर करावी, अशा सूचना वायकर यांनी एसआरएच्या अधिकाऱयांना दिल्या.
























































