युवतीचा विनयभंग प्रकरणी युवकास न्यायालयीन कोठडी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

मालवणातील युवतीचा चालत्या दुचाकीवर विनयभंग केल्याप्रकरणी संशयित आरोपी गणेश सदानंद घुमडेकर (वय- २८, रा. घुमडे) याला मालवण न्यायालयाने १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गणेश याने ११ नोव्हेंबर रोजी चौके ते कुंभारमाठच्या दरम्याने युवतीचा विनयभंग केला होता.

मालवण येथील दोन युवती कट्टा येथून मालवणच्या दिशेने दुचाकीने येत होत्या. त्यावेळी त्यांच्या पाळतीवर असलेल्या संशयितांने कुंभारमाठ येथे आपल्या दुचाकीचा वेग कमी करत एका युवतीच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत पोबारा केला होता. याप्रकरणी पीडित युवतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

युवतीने संशयिताच्या दुचाकीचा क्रमांक दिला होता. त्यानुसार पोलिसानी १२ रोजी संशयिताची दुचाकी ताब्यात घेतली होती. तर संशयित गणेश घुमडेकर याला घुमडे येथून १४ रोजी सायंकाळी ताब्यात घेऊन अटक केली. गुरुवारी मालवण न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.