जुनागढ किल्ला

11182

>> द्वारकानाथ संझगिरी

राजस्थानात बिकानेरला गेल्यावर दोन गोष्टी करायलाच हव्यात. एक बिकानेरचा किल्ला म्हणजे जुनागढ किल्ला पहावा आणि मग बिकानेर बुदिया, कचोरी, समोसे आणि लाळेला आमंत्रण देणाऱ्या मिठाईवर ताव मारणे. ‘हायजिन’ वगैरे डोक्यात ठेवून जुनागढ किल्ल्याच्या समोरच्या ‘पॉश’ रेस्टॉरंटमध्ये जाऊ नका. आम्ही चूक केली. तुम्ही करू नका. तिथे तुम्हाला अनेक गोरी मंडळी दिसतील. ते हॉटेल त्यांच्यासाठी आहे. हॉटेलमध्ये गेल्यावर आपण पारतंत्र्यात आहोत आणि बाहेर ‘डॉग्ज ऍण्ड इंडियन नॉट अलाऊड’ अशी पाटी आहे असा भास होतो. फक्त गोरे जेवत असतात. पदार्थांचे दरही त्यांच्यासाठी म्हणजे त्यांच्या डॉलर्सना साजेसे असतात आणि हॉटेलात इतके गोरे असतात की, आपल्यासारख्या माणसाकडे लक्ष द्यायला तेथील वेटर्सना वेळ नसतो. मला शेवटी उठून मॅनेजरला सांगावं लागलं की, बिकानेर आता स्वतंत्र हिंदुस्थानात आहे. इंग्रज इथून कधीच निघून गेले आहेत.

पण बिकानेरच्या किल्ल्यातून आणि नंतर लालगढ पॅलेसच्या म्युझियममधून चक्कर मारताना एक गोष्ट जाणवते की, तिथे उगवत्या सूर्याला नहमीच नमस्कार केलेला आहे. मग त्या सूर्याचे नाव ‘मोगल सत्ता’ असो किंवा ‘ब्रिटीश सत्ता’. राजपूत शौर्य तिथे नांदते.

बिकानेर हे पूर्वी एक तसा फारसा काही न उगवणारा प्रदेशच होता. महाराजा रावजोधा या जोधपूरच्या राजाच्या पहिल्या मुलाने त्या वांझोटय़ा जमिनीवर शहर उभारलं. त्याचं नाव रावबिका म्हणून शहराचं नाव बिकानेर. मध्य आशिया आणि गुजरातच्या व्यापाराच्या रस्त्यावर ते होते. ते बहरलं कारण तिथे पाण्याचे झरे होते. या बिकाने 1478 साली एक किल्ला तिथे बांधला त्याचे फक्त अवशेष आता शिल्लक आहेत. त्यानंतर शंभर वर्षांनी आजचा जुनागढ किल्ला उभा राहिला. हा उभा राहिला राजा रायसिंगच्या काळात. त्याने 1571 ते 1611 पर्यंत राज्य केलं. राज्य केलं म्हणजे तो अकबराचा मांडलिक झाला. अकबराच्या दरबारात तो सरसेनापती झाला. त्याने राजपूतांचं अर्ध मेवाड जिंकून बादशहा अकबर आणि नंतर जहांगीरच्या पायाशी ठेवलं. त्याबदल्यात गुजरात आणि बऱहाणपूरची जहागिरी मिळविली. कराच्या रूपाने प्रचंड पैसा कमावला आणि त्याने हा ‘चिंतामणी गड’ बांधला. त्याला पुढे जुनागढ हे नाव पडलं. त्यामुळे चित्तोडच्या किल्ल्यावर जसं स्वाभिमानी रक्त सांडलं तसं इथे सांडलं नाही. चित्तोडचा गढ कलाकुसर, श्रीमंती, वास्तूकला, मूर्तीकाम याबाबतीत मोठा नाही, पण त्याला त्यागाचे वलय आहे. या जुनागढचा राजा कला आणि स्थापत्य शास्त्र या विषयात पारंगत होता. परदेशात जाऊन याबाबतीतलं ज्ञान त्याने मिळवलं त्याचा उपयोग त्याने या किल्ल्यात केलेला आढळतो. विशेषतः जी स्मारके तिथे उभारली आहेत त्यातून कलात्मकता ओसंडून वाहताना दिसते. पण त्याला लाचारीची दुर्गंधी येते. विविध महाल हळूहळू कालांतराने उभारले गेले. ऐशआरामासाठी बनवलेले राण्यांचे महाल पाहिले की, राण्यांचा हेवा वाटण्याऐवजी कीव येते. बाहेरच्यांची नजर त्यांच्यावर पडू नये म्हणून जाळय़ा असत. व्हेंटिलेशन अत्यंत कमी असे. त्यांच्यासाठी एक वेगळी मोकळी जागा असे, पण ती फार मोठी नसे. बिकानेरच्या जुनागढमध्ये राण्यांच्या महालामागे खूप मोठी बाग होती. तिथे राण्या विरंगुळय़ासाठी जात. तिथल्या गॅलरीत मी उभा असताना पोपटांचा एक मोठा थवा माझ्या समोरून उडत गेला. क्षणभर राण्यांचा हेवा वाटला, पण मग जाणवलं या राण्यांची अवस्थाही त्या पोपटांसारखीच होती. ते पोपट तरी स्वातंत्र्य उपभोगत होते. राण्यांची अवस्था सोन्याच्या पिंजऱ्यातल्या पोपटासारखी असे. त्यात त्यांची संख्या पंचवीस-तीस-पस्तीस वगैरे. त्यात रखेल्यांची भर. ऐयाशी हा राजघराण्यात जन्माला आल्यावर मिळणारा हा एक हक्क असावा. बरं तो राजा मेल्यावर त्या सर्व राण्यांना, रखेल्यांना चितेवर चढावं लागे. राजाची राणी किंवा रखेल होणं हा शाप असावा.

असो. तिथल्या म्युझियममधल्या वस्तू विशेषतः कपडे, रत्ने, रत्नजडीत हत्यारं, चांदी-सोन्याची लयलूट पाहिल्यावर डोळे दिपतात. पण स्वातंत्र्य आणि पारतंत्र्यातला फरकही कळतो. एक राणा प्रतापसारखा राजा स्वातंत्र्यासाठी जंगलात फिरतो, जमिनीवर झोपतो. तर दुसरा राजा स्वांतत्र्य विकून ऐश्वर्यात लोळतो. राणा प्रताप आठवला की या डोळे दिपवणाऱ्या ऐश्वर्याची शिरारी येते.

1818सालीं ब्रिटिशांनी हिंदुस्थान जिंकल्यावर बिकानेरचे राजे त्यांचे मांडलिक झाले. त्यांच्या इतिहासात गगनसिंग महाराजांचं महत्त्व मोठं आहे. कारण ब्रिटिशांकडून त्यांनी ‘नाईट कमांडर’ हा किताब मिळवला. पहिल्या आणि दुसऱया महायुद्धात मायबाप ब्रिटिश राणीला निष्ठा वाहिली. लालगढ पॅलेसमधील म्युझियम किंवा फोटो गॅलरी पाहायला विसरू नका. ब्रिटिशनिष्ठेच्या खुणा तुम्हाला जागोजागी दिसतात. येथील महाल 1902 ते 1926च्या काळात उभारला. का? कारण जुनागढ जुनाट झाला होता. ब्रिटिशांनी आधुनिक राजाने कसं राहायला हवं हे शिकवलं होतं. ब्रिटिश संस्कृतीचं पाणी पिऊन ही मंडळी आलेली होती. या महालाच्या एका भागात आता या महाराजांचे वंशज राहतात आणि उरलेल्या भागाचं पंचतारांकित लालगढ हॉटेल केलंय.

राजकन्या राजश्री कुमारी ते चालवते. या महालाचा आर्किटेक्टही ब्रिटिशच होता. सर सॅम्युअल स्विन्टन जेकब. त्या काळात एक लाखाचा अंदाजे खर्च येईल वाटणारा महाल शेवटी दहा लाखांचा झाला. कारण जगातला सर्वोत्कृष्ट माल वापरला गेला. तिथे राणी मेरी, राजा किंग जॉर्ज पाचवा, लॉर्ड हार्डिंग, लॉर्ड आयर्विन वगैरे तिथे राहून गेले आहेत. तीन मजली तो महाल आहे. बाहेर थर वाळवंटातला लाल दगड वापरल्याने त्याला एक वेगळं सौंदर्य प्राप्त झालंय.
बिकानेरचा तो किल्ला, लालगढ हॉटेल, त्याचा म्युझियम पाहताना श्रीमंती पद्मिनीसारख्या देखण्या ललनेचं रूप घेऊन समोर येते. तिच्या कला सौंदर्याचं कौतुक करावंसं वाटतं. त्याने घायाळ व्हायला होतं, पण तिच्या अंतःकरणात डोकावलं की ते सौंदर्य शापित वाटतं.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या