अरण्य वाचन

64

अनंत सोनवणे,[email protected]

हिंदुस्थानातल्या सर्व व्याघ्र प्रकल्पांमध्ये सर्वात वेगळा, आकर्षक आणि तितकाच भयावह व्याघ्र प्रकल्प म्हणजे सुंदरबन! सागरी वृक्षलता वेलींनी बनलेलं हे अरण्य आपल्या कल्पनेच्या पलीकडलं भासावं इतकं सुंदर आणि गूढ आहे. सुमारे दहा हजार चौरस किलोमीटर पसरलेल्या या अरण्याचा काही भाग हिंदुस्थानात, तर काही भाग बांग्लादेशात येतो. गंगा, ब्रह्मपुत्रा व मेघना या नद्या तिथं बंगालच्या उपसागराशी मिलन पावतात, तिथं सागरी वनस्पतींनी बनलेला अतिविशाल त्रिभूज प्रदेश तयार झालाय. सुंदरबन हा या त्रिभूज प्रदेशाचाच एक भाग. सुंदरी ही जलवनस्पती इथं सर्वत्रच आढळते. त्यावरूनच या जंगलाला सुंदरबन हे नाव मिळालं.

वाघ ही सुंदरबनची प्रमुख ओळख. इथलं खारं पाणी, पाणवेलींची जाळी, दलदल, भक्ष्य मिळवण्यासाठी करावी लागणारी प्रचंड मेहनत, मानवी अतिक्रमण या साऱया प्रतिकूल परिस्थितीशी जुळवून घेत जंगलचा राजा इथं आपलं अस्तित्व यशस्वीपणे टिकवून आहे. साधारणतः 15 वर्षांपूर्वी हिंदुस्थान-बांगलादेश दोन्हीकडच्या सुंदरबनात एकूण 700 च्या आसपास वाघ असावेत, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. ब्रिटिशकाळात इंग्लंडचा राजा डय़ूक ऑफ एडिंबरो यानं सुंदरबनातल्या बुरीरदाबरी या परिसरात एका भल्या थोरल्या वाघाची शिकार केली. त्याचं मर्दानी सौंदर्य पाहून त्यानं त्याला ‘रॉयल बेंगॉल टायगर’ असं नाव दिलं. तेव्हापासून हिंदुस्थानी वाघ याच नावानं ओळखला जाऊ लागला.

सुंदरबनातली वन्यजीव सफारी बोटींमधून होते. ही अरण्ययात्रा अत्यंत रोमांचकारी असते. उपसागराच्या मुखावरच्या किनाऱया किनाऱयाने जलप्रवास करत असताना नकळत मनावर दडपण जाणवत राहतं. आसपास वाघाचं अस्तित्व सातत्यानं भासत राहतं. कधी किनाऱयावरच्या ओल्या मातीत त्याच्या पंजांचे ठसे दिसतात, तर कधी एखाद्या झाडावर त्याच्या नखांचे ओरखडे उमटलेले दिसतात. अचानक एखाद्या ठिकाणी माकडं भयभीत आकांत करून अवघ्या जंगलाला त्याच्या अस्तित्वाची माहिती पोचवताना दिसतात. असं असलं तरी सुंदरबनचा हा राजा तुम्हाला प्रत्यक्ष दर्शन देईलच याची खात्री अजिबात देता यायची नाही. हेण्टल पाम या झुडुपी झाडांची पाने लालसर व पिवळसर तपकिरी रंगाची असतात. वाघ त्या पामच्या रंगरूपाशी असा काही मिसळून जातो की तो पामखाली बसला आहे हे लक्षात येत नाही. इथले नावाडी सांगतील की, दिसत नसला तरी एखाद्या झुडुपाआडून वाघ तुम्हाला पाहात असतो. तुमचं बारकाईने निरीक्षण करत असतो.

सुंदरबनातले वाघ नरभक्षक आहेत असा एक सार्वत्रिक समज आहे. मात्र त्यात तथ्य नाही. इथं वाघाने माणसावर हल्ला केल्याच्या घटना घडतात हे सत्य आहे. मात्र बहुतांश वेळा त्या अपघाताने घडतात. मनाई असतानाही ग्रामस्थ, चोरटे, भिकारी जंगलात घुसखोरी करतात. अशावेळी वाघाने हल्ला करणं स्वाभाविक आहे. इथला वाघ पट्टीचा पोहणारा आहे. मच्छिमारांच्या बोटीतल्या माशांवर डल्ला मारायचा तो प्रयत्न करतो. त्यातून संघर्षाचे प्रसंग उद्भवतात. कधी भिकारी, लाकुडतोडे मच्छिमारांच्या दोन गटांमध्ये हाणामारी होते. खून पडतात आणि बिल वाघाच्या नावावर फाडलं जातं. या साऱयामुळे इथं वाघ आणि माणूस यांच्या दरम्यानचं नातं प्रचंड तणावाचं आहे. वाघांना दूर ठेवण्यासाठी सौम्य वीज प्रवाहाने भारीत मातीचे पुतळे ठिकठिकाणी उभारणं डोक्यावर मागच्या बाजूला रबराचा मानवी मुखवटा परिधान करणं असे उपाय योजले जातात. तीनशे वर्षांपूर्वी इथला दोन शिंगी गेंडा नामशेष झाला. सुंदरबन म्हणजे निसर्गदेवतेचा एक आगळावेगळा आविष्कार आहे. इथल्या प्रत्येक क्षणात रोमांच आहे; थरार आहे. तो प्रत्यक्ष अनुभवायचा असेल तर आयुष्यात एकदा तरी सुंदरबनच्या पाण्यातली अरण्ययात्रा करायलाच हवी.

सुंदरबन व्याघ्र प्रकल्प

प्रमुख आकर्षण…वाघ

जिल्हा…24 परगणा, खुलना, बाकेरगंज

राज्य…पश्चिम बंगाल

क्षेत्रफळ…1330 चौ. कि. मी. निर्मिती…1973

जवळचे रेल्वे स्थानक…कॅनिंग (48 कि. मी.)

जवळचा विमानतळ…कोलकाता (140 कि. मी.)

निवास व्यवस्था…खासगी हॉटेल्स व कॅम्पस

सर्वाधिक योग्य हंगाम…सप्टेंबर ते मार्च

सुट्टीचा काळ…नाही, साप्ताहिक सुट्टी…नाही

 

आपली प्रतिक्रिया द्या