अरण्य वाचन…काबिनीचं काळं भूत

122

अनंत सोनावणे,[email protected]

ब्लॅक पँथर, बिबटय़ा, वाघ यांचा हक्काचा अधिवास म्हणजे कर्नाटकातील काबिनी अभयारण्य….

 

2015 सालचा एप्रिल महिना माझ्या कायम स्मरणात राहील. सालाबादप्रमाणे पत्नीसह मी जंगल सफारीला निघालो होतो. यावर्षी आवर्जून दक्षिण हिंदुस्थानात दौरा काढला होता. तत्पूर्वी गेली 10 वर्षे आम्ही हिंदुस्थानातल्या विविध जंगलांमध्ये भटकलो होतो. अनेक ठिकाणी वाघाचं मनसोक्त दर्शन झालं होतं. पण मार्जारकुळातल्या एका प्राण्यानं आम्हाला नेहमीच हुलकावणी दिली होती. बिबटय़ानं. महानगरी मुंबईत केवळ आदिवासी पाडय़ांवरच नव्हे, तर पॉश निवासी गृहसंकुलांमध्येही वरचेवर भेट देणारा बिबटय़ा त्याच्या घरात-जंगलात जाऊनही आम्हाला आजवर दिसला नव्हता. अत्यंत लाजरा, तरीही धाडसी, सदैव सावध, गूढ असा हा उमदा प्राणी त्याच्या नैसर्गिक अधिवासात पाहता यावा, ही इच्छा तब्बल 10 वर्षे अपूर्ण राहिली होती. यावेळी वाघ दिसला नाही तरी चालेल पण बिबटय़ाचं दर्शन व्हावं, अशी प्रार्थना करतच आम्ही जंगलात शिरलो… आणि निसर्ग देवतेनं आमची प्रार्थना ऐकली! एकूण 4 सफारीमध्ये आम्हाला एक-दोन नव्हे तर चक्क 12 बिबटय़ाचं दर्शन झालं. आमची इच्छापूर्ती करणारं ते जंगल होतं काबिनी वन्यजीव अभयारण्य!!!

p-2

हिरव्याकंच जंगलांनी व्यापलेल्या कर्नाटकात नागरहोळे राष्ट्रीय उद्यान आहे. काबिनी अभयारण्य या नागरहोळेचाच एक भाग. नागरहोळे, बांदीपूर, मुदूमलाई, वायनाड या याचा संरक्षित जंगलांचा मिळून दोन हजारपेक्षा जास्त चौरस किलोमीटर क्षेत्रफळाचा व्यापक हिरवा पडदा तयार होतो. काबिनी जलाशय नागरहोळे आणि बांदीपूरला एकमेकांपासून वेगळं करतो. काबिनी नदीवर मोठं धरण बांधण्यात आलंय. या नदीच्या नावावरूनच तिच्या काठावरच्या जंगलाचं नामकरण झालं.

1999 साली नागरहोळेला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. साहजिकच नागरहोळेचा भाग असलेल्या काबिनी अभयारण्यातही वाघांचा निवास आहे. एकेकाळी मैसूरचे महाराज आणि ब्रिटिशांचं शिकार करण्याचं आवडतं ठिकाण असलेलं काबिनी आज संरक्षित जंगल आहे. त्यामुळे वाघ इथं निर्धास्तपणे वावरतात. माझ्या काबिनी भेटीदरम्यान मलाही एका दमदार नर वाघानं दर्शन दिलं होतं. उन्हाची तलखी शमवण्यासाठी तो एका पाणवठय़ावर पाण्यात बसला होता. काही वेळानं पाण्यातून उठून शांतपणे चालत रस्ता ओलांडून गर्द झाडीत दिसेनासा झाला. त्याचं ते निथळत्या अंगानं दमदार पावलं टाकत ऐटबाज चालणं, मला आजही आठवतं. काही वर्षांनंतर भक्ष्याचा पाठलाग करताना कुंपणाच्या लोखंडी सळ्या पोटात घुसल्यानं तो मरण पावल्याची बातमी वाचनात आली…

वाघापेक्षाही काबिनीत पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय असतो तो बिबटय़ा. इथं फिरताना तुम्हाला सदैव तुम्ही त्याच्या राज्यात असल्याचं जाणवतं. आसपासच्या झाडीतून अचानक समोर येऊन तो रस्ता अडवेल किंवा एखाद्या आडव्या फांदीवर आरामात पडलेला असताना खाली लोंबकळणारी शेपटी तुम्हाला त्याचा अस्तित्वाची साक्ष देईल, असं वाटत राहतं. इथले बिबटे मानवी वावराला सरावलेले असल्यानं आपल्याला पाहूनही लगेच अंतर्धान पावत नाहीत. आम्हाला रस्ता ओलांडताना, झुडपात सावध बसलेला, पाठवठय़ावर आलेला, झाडावर आराम करणारा… अशा सर्व रूपात त्यानं दर्शन दिलं.

pan-3

अर्थात आमच्यापेक्षाही काही पर्यटक भाग्यवान असतो. ज्यांना इथं दिसतो – ब्लॅक पँथर! काबिनीचा आत्मा! काबिनीचं प्रसिद्ध काळं भूत! याची एक झलक पाहता यावी? यासाठी वन्यजीवप्रेमी तरसत असतात. हिरव्यागर्द पार्श्वभूमीवर या ब्लॅक ब्युटीचा एक फोटो काढता यावा यासाठी छायाचित्रकार वर्षानुवर्षे प्रतीक्षा करत असतात. इतर कुठल्याही जंगलांपेक्षा काबिनीमध्ये ब्लॅक पँथर दिसल्याची नोंद सर्वाधिक असावी.

वाघ-बिबटय़ा-ब्लॅक पँथर या त्रयींशिवाय आशियाई हत्तीचंही काबिनी प्रमुख आश्रयस्थान आहे. काबिनी नदीतून बोटीने किंवा बांबूपासून बनवलेल्या गोलाकार कोरॅकलमधून फिरताना नदीकाठी तुम्हाला हत्तींचे कळप चरताना दिसतील. त्यांच्यासोबत विशालकाय रानगवेसुद्धा नदीच्या काठावर दिसू शकतील. याशिवाय इथं चितळ, सांबर, रानडुक्कर, रानकुत्रे, माकड, रानमांजर, मुंगूस, सालिंदर, पाणमांजर, शेकरू, लांडगा, ससा, मगर इत्यादी प्राणीही पहायला मिळतात. नशीबवान असाल तर उडती खार, उदमांजर, खवले मांजर किंवा लजवंती वानराचंही दर्शन होऊ शकतं. काबिनीत खासगी वाहनांना परवानगी नाही. खुल्या जिप्सी किंवा जाळीदार कँटोरमधून जंगल सफारी करता येते. जंगल लॉजेसतर्फे काबिनी रिव्हर लॉजमध्ये निवासाची अतिउत्तम सोय आहे. ती महाग आहे, मात्र जंगलाचा सर्वांगसुंदर अनुभव देणारी आहे.

काबिनी वन्यजीव अभयारण्य

प्रमुख आकर्षण…ब्लॅक पँथर, वाघ, बिबटय़ा, हत्ती

जिल्हा…कोडाणू, मैसूर, राज्य…कर्नाटक

क्षेत्रफळ….55 चौ.कि.मी., निर्मिती…1988

जवळचं रेल्वे स्थानक…मैसूर (80 कि.मी.)

जवळचा विमानतळ…बंगळुरू (210 कि.मी.)

निवास व्यवस्था…काबिनी रिव्हर लॉज, खासगी हॉटेल

सर्वाधिक योग्य हंगाम…ऑक्टोबर ते मे

सुट्टीचा काळ…नाही, साप्ताहिक सुट्टी…नाही

 

आपली प्रतिक्रिया द्या