खूप मोठा हो, महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल कर! ‘जुनिअर भारत श्री’ राज सुर्वेला उद्धव ठाकरेंचे आशीर्वाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

खूप मोठा हो, क्रीडा क्षेत्रातील चमकदार कामगिरीने महाराष्ट्राचे आणि देशाचे नाव उज्ज्वल कर! असे आशीर्वाद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी “जुनिअर भारत श्री” किताब पटकावणारा मुंबईचा शरीरसौष्ठवपटू राज सुर्वे याला नुकत्याच मातोश्री निवासस्थानी येथे झालेल्या भेटीत दिले. राज याने नुकत्याच जम्मू येथे आयोजित राष्ट्रीय जुनिअर शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना “जुनिअर भारत श्री” ‘किताब पटकावण्याचा पराक्रम साकारला. आपल्या या यशानंतर राज याने शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले.राज हा शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांचा पुत्र आहे.

बोरिवली येथील आदित्य आर्किटेक्ट महाविद्यालयात शिकणाऱ्या राज सुर्वे याने जम्मू येथे नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय जुनिअर शरीरसौष्ठव स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवत “जुनिअर भारत श्री” हा बहुमानाचा किताब पटकावला. आपल्या या यशानंतर राज याने मुंबईत परतताच मातोश्री निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद घेतले. उद्धव ठाकरे यांनी राज याला भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि मराठी मातीचा व महाराष्ट्राचा मान राष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात मोठा केल्याबद्दल राजचे कौतुक केले. बोरिवलीकर नागरिकांनीही आपल्या या पराक्रमी भूमिपुत्रांच्या यशाबद्दल त्याची ढोल-ताशांच्या गजरात मोठी मिरवणूक काढली.

‘मुंबई श्री’ ते जुनिअर ‘भारत श्री’
आर्किटेक्टच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या राज सुर्वे याने मोठ्या परिश्रमाने मुंबई श्री ते जुनिअर ‘भारत श्री’ किताबापर्यंत मजल मारली आहे. आपला अभ्यास सांभाळून तो सध्या 8-8 तास व्यायाम करतो आणि योग्य आहारांबाबतचे काटेकोर पालन करतो. मुंबईत झालेल्या स्पर्धेत त्याने ‘मुंबई श्री’ तर पुण्यातील शरीरसौष्ठव स्पर्धेत ‘महाराष्ट्र श्री’ किताब पटकावला होता. जम्मूतील जुनिअर राष्ट्रीय शरीसौष्ठव स्पर्धेत राज याने 21 राज्यांतील 210 स्पर्धकांशी स्पर्धा करीत जुनिअर ‘भारत श्री’ किताबाला गवसणी घातली आहे. आपल्या या उज्वल यशाचे श्रेय राज आपले कुटुंबीय, आपल्या कॉलेजच्या प्राचार्या रिठा नाईक, आयबीबीएफचे सचिव संजय मोरे, प्रशिक्षक विशाल सावंत, मेंटॉर मंदार अगवणकर, नरेंद्र कदम आणि आदित्य आर्किटेकट कॉलेजच्या एचओडी तृप्ती बिस्वास यांना देतो. या सर्वांच्या सहकार्यामुळेच आपण शरीरसौष्ठव क्षेत्रात एवढे मोठे यश मिळवू शकलो असे राज म्हणाला.