कमीत कमी वेळेत न्याय मिळायला हवा! सरन्यायाधीश गवई यांचे मत

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या मंडणगड तालुक्यातील नवीन दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या सुसज्ज इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते रविवारी झाले. न्यायालयाच्या इमारतीमधून समाजाच्या अगदी शेवटच्या घटकाला कमीत कमी वेळेत आणि कमीत कमी खर्चात न्याय मिळावा, तेव्हाच खऱया अर्थाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वप्न पाहिलेल्या सामाजिक आणि आर्थिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा सरन्यायाधीशांनी व्यक्त केली.

मंडणगडच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या उद्घाटनाचा सोहळा रविवारी पार पडला. या सोहळ्यात बोलताना सरन्यायाधीशांनी न्यायव्यवस्थेकडून जनतेची असलेली अपेक्षा यावर मत व्यक्त केले. सोहळ्यादरम्यान न्यायालय इमारतीच्या प्रांगणात उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तसेच म्युरलचे अनावरण सरन्यायाधीशांनी केले. तसेच न्यायदान कक्षाचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. दिवाणी न्यायाधीश अमृता जोशी यांना आसनावर विराजमान करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे येथील स्मारकाच्या आराखडय़ाला वेग देण्याचे काम करू, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या सोहळ्याला उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते.

संविधानामुळेच देश अखंड

कायदेमंडळ, मंत्रिमंडळ आणि न्यायपालिका हे प्रशासनाचे तिन्ही स्तंभ देशाच्या नागरिकांना न्याय देण्यासाठीच काम करतात. त्यांचे अधिकारक्षेत्र स्वतंत्र असले तरी त्यांनी एकमेकांविरोधात काम करू नये. शेजारच्या राष्ट्रांमध्ये अराजकतेची स्थिती आहे. मात्र आपला देश संविधानामुळे अखंड आणि एकसंध आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीशांनी केले.

उद्धव ठाकरे यांचे मानले आभार

सरन्यायाधीशांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सहकार्याचा विशेष उल्लेख केला. मंडणगड न्यायालयाची इमारत उभारण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सहकार्य मिळाले. मी याप्रसंगी त्यांचे आभार मानू इच्छितो. महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो. त्यांनी न्यायालयांच्या इमारतींसाठी खूप चांगले सहकार्य केले, असे सरन्यायाधीश म्हणाले.