गेहलोत-पायलट यांचे मनोमीलन, वेणुगोपाल यांनी घडवला समेट

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यात काँगेस नेते के. सी. वेणुगोपाल यांनी समेट घडवून आणला आहे. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा राजस्थानात दाखल होण्यापूर्वीच हे मनोमीलन झाल्याने काँगेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा सध्या मध्य प्रदेशात पोहोचली आहे. मध्य प्रदेशातील यात्रेचा टप्पा पूर्ण झाल्यानंतर ती यात्रा राजस्थानमध्ये प्रवेश करणार आहे. राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा राजस्थानमध्ये प्रवेश करण्यापूर्वी काँगेसची चिंता वाढली होती. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वाद विकोपाला गेला होता, मात्र आज राजस्थानात जे घडलं त्यामुळे काँगेस आणि राहुल गांधी यांची चिंता नक्कीच कमी झाली आहे.

भाजप ‘भारत जोडो’ यात्रेला घाबरत असल्याचे अशोक गेहलोत म्हणाले. यात्रेविरुद्ध भाजप लोकांना भडकवण्याचे काम करत असल्याचे गेहलोत म्हणाले. राजस्थानमध्ये सर्वजण एक आहेत. आम्ही दोघेही एकत्र आहोत. ही काँग्रेस पक्षाची खासियत आहे. राहुल गांधी यांनी दिलेल्या संदेशानंतर आम्ही दोघे एकत्र आल्याचे अशोक गेहलोत म्हणाले. ‘भारत जोडो’ यात्रेमुळे देशभर उत्साहाचे वातावरण आहे. राजस्थानमध्ये ‘भारत जोडो’ एक नंबर होईल, असे सचिन पायलट म्हणाले.