
सलमान खानचा 2015 मध्ये आलेला ‘बजरंगी भाईजान’ हा चित्रपट आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे. कबीर खान दिग्दर्शित या चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले आणि प्रेक्षकांनीही त्यावर खूप प्रेम केले. चाहते बऱ्याच काळापासून या चित्रपटाच्या सिक्वेलची वाट पाहत होते. अखेर ‘बजरंगी भाईजान 2’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित करण्याच्या विचारात आहे.
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत दिग्दर्शक कबीर खान याने खुलासा केला की, सलमान खान सोबत ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल ते चर्चा करत आहेत. कबीर यासंदर्भात अधिक बोलताना म्हणाले की, आम्ही ‘बजरंगी भाईजान 2’ या चित्रपटाबद्दल चर्चा करत आहोत. परंतु केवळ सिक्वेल आणायचा म्हणून नाही तर, तो आणताना आम्ही प्रचंड विचारपूर्वक आणणार आहोत. आधीच्या चित्रपटाने प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा हा सिक्वेल आणताना आम्हाला अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागणार आहे.
कबीर खान यावर अधिक भाष्य करताना म्हणाले की, अजूनही आमच्याकडे चित्रपटाची पटकथा तयार नाही. परंतु ज्याक्षणी एखादी कथा आली आणि ती आवडली तर, आम्ही नक्कीच ‘बजरंगी भाईजान 2’ आणू.”. “मला ‘बजरंगी भाईजान 2’ दिग्दर्शित करायला आवडेल, पण योग्य कारणांसाठी, चुकीच्या कारणांसाठी नाही. मला ते बॉक्स ऑफिस नंबरसाठी करायचे नाही, तर ‘बजरंगी भाईजान’ सारख्या एका चित्रपटाला न्याय द्यायचा म्हणून मी हा चित्रपट नक्कीच दिग्दर्शित करेन.
2015 मध्ये आलेल्या ‘बजरंगी भाईजान’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हा चित्रपट 90 कोटींच्या बजेटमध्ये बनवण्यात आला होता. रिलीज झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळाले आणि त्याने भरपूर पैसे कमावले. या चित्रपटाने 7 आठवडे थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आणि या चित्रपटाने जगभरातून 922 कोटी इतकी कमाई केली होती.