कडवई-तुरळ रस्ता 6 महिन्यात खड्ड्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संगमेश्वर तालुक्यातील कडवई – तुरळ रस्त्याचे लाखो रुपये खर्च करून नव्याने काम केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यातच या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याविरोधात आता येथील रिक्षा संघटना आक्रमक झाली असून, लवकरच या रस्त्याच्या निगृष्ट कामाविषयीची तक्रार देणार असल्याची माहिती कडवई रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद चव्हाण यांनी दिली.

कडवई – तुरळ रस्त्याची दुरवस्था झाल्यानंतर कडवई तुरळ-चिखली रिक्षा मालक-चालक संघटनेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाला आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्याची दखल घेत बांधकाम विभागाने या रस्त्याचे नव्याने काम करण्यास परवानगी दिली होती. सहाच महिन्यांपूर्वी सुमारे अडीच किलोमीटरच्या या रस्त्यावर जवळपास 40 लाख रुपये खर्च करुन काम करण्यात आले.

या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने निविदेप्रमाणे बीबीएमवर बीएम त्यानंतर कार्पेट व सीलकोट असे काम करणे गरजेचे होते. मात्र, बीबीएम न करताच रस्त्याचे काम करण्यात येत होते व ही बाब बांधकाम विभागाच्या निदर्शनाला आणून देण्यात आली होती. हीच बाब ठेकेदाराच्या निदर्शनाला आणून दिली असता, त्याने हे काम परवडत नसल्याने आपण बीबीएम न करताच बीएमचा थर टाकल्याचे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमोरच सांगितले होते. मात्र, त्यातही योग्य साहित्याचा वापर होत नसल्याने रिक्षा संघटनेने हे काम थांबवले होते. हे काम व्यवस्थित करण्याची हमी मिळाल्यानंतरच पुन्हा काम सुरू करण्यास होकार दर्शविण्यात आला होता.

मात्र, संबंधित ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याचे वेळोवेळी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्याकडे बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या रस्त्याच्या साईडपट्टीसह संपूर्ण रस्त्याचीच दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे तातडीने या रस्ता कामाची चौकशी करावी व संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी मिलिंद चव्हाण यांनी केली आहे.