ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या छेडछाड प्रकरणावर भाजपच्या मंत्र्यांचं वादग्रस्त विधान; खेळाडूंना दोष देत म्हणाले, “बाहेर पडण्याआधी…”

हिंदुस्थानात सध्या आयसीसी महिला विश्वचषक सुरू आहे. साखळीतील सर्व लढती पार पडल्या असून आता सेमीफायनल लढतींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पहिला सामना इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका, तर दुसरा सामना यजमान हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलियाच्या संघात होईल. 29 आणि 30 ऑक्टोबरला सेमीफायनल, तर 2 नोव्हेंबरला फायनल रंगणार आहे. ही स्पर्धा सुरू असताना इंदूरमध्ये एक लाजिरवाणी घटना घडली. ऑस्ट्रेलियाच्या दोन महिला क्रिकेटपटूंची भर रस्त्यात छेड काढण्यात आली. क्रीडा विश्वात खळबळ उडवणाऱ्या या घटनेमुळे संतापाची लाट उसळलेली असताना आता मध्य प्रदेशमधील भाजप मंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी वादग्रस्त विधान करत खेळाडूंनाच दोषी धरले.

ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडू हॉटेलमधून कॅफेत जात असताना दुचाकीवरून आलेल्या व्यक्तीने त्यांच्याची घाणेरडे वर्तन केले होते. त्याने महिला क्रिकेटरला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत अकील अहमद याला बेड्याही ठोकल्या. त्यानंतर कैलाश विजयवर्गीय यांनी दिलेली प्रतिक्रिया वादाचे कारण ठरले आहे. विजयवर्गीय यांना खेळाडूंचेच कान टोचले. बाहेर कुठेही जाण्याआधी स्थानिक प्रशासनाला कळवणे आवश्यक असून हा आपल्यासाठी एक धडा असल्याचे ते म्हणाले.

काय म्हणाले विजयवर्गीय?

बाहेर जाण्यापूर्वी खेळाडूंनी काळजी घेतली पाहिजे आणि स्थानिक अधिकारी, प्रशासनाला माहिती दिली पाहिजे. इंग्लंडमध्ये जशी फुटबॉलची क्रेझ आहे, तशी आपल्याकडे क्रिकेटची आहे, असे म्हणत विजयवर्गीय यांनी एक किस्साही सांगितला. मी इंग्लंडमध्ये फुटबॉल खेळाडूंचे कपडेही फाटलेले पाहिले आहेत. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो तिथे एक खेळाडू कॉफी पीत असताना काही तरुण-तरुणी आले. एका मुलीने खेळाडूचे चुंबन घेतले आणि त्याचे कपडे फाडले. तो इंग्लंडचा एक प्रसिद्ध खेळाडू होता, असे विजयवर्गीय म्हणाले.

वर्ल्डकप खेळण्यासाठी हिंदुस्थानात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या 2 महिला क्रिकेटरशी इंदूरमध्ये गैरवर्तन, आरोपीला अटक

खेळाडू लोकप्रिय असून त्यांनी त्यांच्या लोकप्रियतेची आणि सुरक्षिततेची जाणीव ठेवली पाहिजे. बाहेर कुठेही जाण्यापूर्वी खेळाडूंनी स्थानिक प्रशासन किंवा सुरक्षा अधिकाऱ्यांना कळवावे, असेही विजयवर्गीय म्हणाले. तसेच सुरक्षेत चूक झाली हे खरे असले तरी खेळाडूंना प्रशासन किंवा सुरक्षा अधिकाऱ्यांना कळवणे आवश्यक होते. इंदूरमध्ये जे घडले ते सर्वांसाठी धडा आहे, असेही विजयवर्गीय म्हणाले. त्यांच्या या विधानावरून नवा वाद उफाळून आला आहे.

लाज वाटली पाहिजे, काँग्रेसची टीका

मध्य प्रदेशमध्ये ऑस्ट्रेलियाच्या महिला खेळाडूंसोबत छेडछाड झाली आणि आता भाजप सरकारचे मंत्री कैलाश विजयवर्गीय महिला खेळाडूंनाच सल्ला देत आहेत. त्यांना दोषी ठरवत आहेत. भाजपच्या मंत्र्यांचे म्हणणे आहे की, महिला खेळाडूंना स्थानिक व्यक्तीला सांगून बाहेर जायला हवे होते. भाजपच्या नेत्यांना लाज विकून खाल्ली असून या लाजिरवाण्या विधानाबाबत त्यांना माफी मागितली पाहिजे, अशी टीका काँग्रेसने केली.