मी तुम्हाला हरू देणार नाही! पाहा ‘तान्हाजी’मधला काजोलचा पहिला लूक

हिंदुस्थानचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत प्राणांची बाजी लावून स्वराज्यासाठी बलिदान देणाऱ्या नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित तान्हाजी हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वीच तान्हाजी या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये चित्रपटांची शंभरी पूर्ण करणाऱ्या अजयने आपला तान्हाजीमधला लूक शेअर केला होता. डोक्याला असलेले मुंडासे आणि नजर रोखून पाहणाऱ्या तानाजी मालुसरे यांच्या रुपात अजय देवगणला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता चित्रपटात तान्हाजीच्या पत्नीच्या भूमिकेत झळकणाऱ्या अभिनेत्री काजोल हिचाही लूक व्हायरल झाला आहे.

अभिनयाचा मराठमोळा आणि ‘समर्थ’ वारसा लाभलेल्या काजोलचा हा अस्सल मराठी वेशातला फोटो लोकप्रिय होताना दिसत आहे. कपाळावर रेखलेलं टपोरं कुंकू, काजळभरले डोळे, गळ्यात काळी पोत, नाकात नथ आणि डोक्यावर पदर अशा वेशातली तान्हाजी मालुसरे यांची पत्नी काजोलच्या रुपात साकारलेली पाहायला मिळत आहे. मी तुम्हाला कधीच हरू देणार नाही, अशी कॅप्शनही या फोटोखाली देण्यात आली आहे. त्यामुळे चित्रपटातली काजोलची भूमिकाही तितकीच ताकदीची असेल असा अंदाज वर्तवण्यात येतोय. ओम राऊत दिग्दर्शित तान्हाजी हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी प्रदर्शित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या