
घरफोडीच्या वाढत्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी कळंब येथील धाडसी उपविभागीय पोलीस अधिकारी एम. रमेश हे जनतेच्या मदतीला सरसावले असून यांच्या पुढाकारातून एक नवा उपक्रम राबविण्यात येत आहे.
बाहेरगावी जातेवेळी कळंब ग्रामस्थ त्यांची माहिती व्हॉटसअॅपला कळवतील आणि पोलीस त्यांच्या घराची राखण करतील, असा हा उपक्रम आहे. या उपक्रमामुळे चोरीचे गुन्हे रोखण्यास मदत होणार असून पोलीस आता ग्रामस्थांच्या मदतीने चोरांना रोखण्यात यश मिळवणार आहेत.
घराला कुलूप लावून अनेकजण आपल्या गावी किंवा बाहेरगावी कुटुंबीयांसह जातात. घराजवळ सामसूम असल्याची संधी साधून चोरटे कुलूपबंद घरात चोरी करतात. त्या अनुषंगाने पोलीस दलाच्या वतीने घरफोडीचे गुन्हे रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी एम. रमेश यांच्या पुढाकारातून एक नवा उपक्रम राबविण्यात येत आहे. कॉलनीत कोणीही संशयीत व्यक्ती दिसल्यास त्याची तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी घराला कुलूप लावून गावी जायचे असल्यास 8369907421 या व्हाट्सअॅप क्रमांकावर नाव व पत्त्यासह माहिती पाठवावी. संबधित कुटुंबिय घराकडे येईपर्यंत त्यांच्या घरात चोरी होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा रात्रंदिवस लक्ष ठेवेल. नागरिकांनी गावी जाताना विशेष काळजी घेवून उपाययोजना राबवाव्यात, सीसीटीव्ही लावावेत.
उपविभाग कळंब हददीतील चोरी, घरफोडी अशा गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याकामी जिल्हा पोलीस अधीक्षक निवा जैन पोलिस यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी एम रमेश यांच्या संकल्पनेतून पोलिस स्टेशन कळंब, ढोकी, येरमळा, शिराढोण येथील प्रभारी अधिकारी यांना एप्रिलमध्ये हद्दीतील गावांना भेटी देऊन ग्रामरक्षक दल कार्यान्वित करून चोरी घरफोडी यांना प्रतिबंध करण्याच्या उपाययोजना व आपल्या घराच्या सुरक्षेकरिता डोअर सेन्सर, लॉक सेन्सर, पोर्च सेन्सर यांचे प्रात्यशिक दाखवण्याबाबतचे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.


























































