
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
महिलेच्या वेशभूषेत कालिकादेवीची उपासना करून घराकडे परतणाऱ्या एका अनाथ तरुणाची महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना दिल्लीत घडली आहे. मृत तरुणाचे नाव कालू (२२) असून तो कालिकादेवीचा निस्सीम भक्त होता. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली असून पोलीस इतरांचा शोध घेत आहेत.
मंगळवारी व शनिवारी महिलांसारखी वेशभूषा तो करायचा व देवीची आराधना करायचा. मंगळवारी रात्री उशिरा मंदिरातून तो घराकडे निघाला. तो ओखला इन्डस्ट्रियल परिसरातून जात होता. त्याचवेळी दिल्ली विद्यापीठातील काही मद्यधुंद विद्यार्थी तिथे फिरायला आले होते. त्यांचे लक्ष कालूकडे गेले. त्यांनी त्याला महिलांच्या वेशभूषेवरून, मेहंदीवरून व पैंजणावरून डिवचले. यावरून कालू व त्यांच्यात बाचाबाची झाली. त्याच दरम्यान एका विद्यार्थ्याने चाकूने कालूच्या चेहऱ्यावर, डोक्यावर व छातीवर चाकूने सपासप वार केले. कालू खाली कोसळताच विद्यार्थ्यांनी तिथून पळ काढला.
रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांची नजर कालूवर पडली. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबद्दल कळवले. त्यानंतर कालूला रुग्णालयात नेण्यात आले. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कालू अनाथ होता. लहानपणी धर्मशाला येथून त्याला आणण्यात आले होते. तो कालिकादेवीचा भक्त होता. मंगळवारी व शुक्रवारी तो महिलांप्रमाणे काळ्या रंगाचा कुर्ता व सलवार परिधान करायचा. त्यावर लाल रंगाची ओढणी घालायचा. पायात पैंजण घालायचा व हाताला मेहंदी लावायचा. त्यानंतर तो मंदिरात जाऊन देवीची प्रार्थना करायचा. पण त्याचे हेच महिलांचे कपडे परिधान करणे त्याच्या जीवावर बेतल्याने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

























































