माहीमनंतर कल्याणमध्ये ‘सुटकेस डेडबॉडी’

566

माहीम चौपाटीवर बॅगमध्ये खांडोळी केलेला तरुणाचा मृतदेह सापडल्याच्या घटनेने खळबळ उडाली असताना आज पुन्हा ‘सुटकेस डेडबॉडी’ने कल्याण हादरले. पहाटे साडेपाच वाजता कल्याण रेल्वे स्टेशनबाहेर दोघा अज्ञातांनी मुंडके छाटलेला 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह फेकून पळ काढला.

पहाटे साडेपाच वाजता कल्याण रेल्वे स्टेशनच्या बाहेर व्होडाफोन गॅलरीजवळून दोघे अज्ञात तरुण संशयितरित्या काळ्या रंगाची सुटकेस घेऊन जात होते. यावेळी उग्र वास येत असल्याने उपस्थित रिक्षाचालकांनी सुटकेसमध्ये काय आहे, असे विचारताच मारेकरी सुटकेस तिथेच टाकून पळाले. यानंतर रिक्षाचालकांनी लगेचच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाक घेत सुटकेस उघडली असता एका प्लास्टिक पिशवीत मृत महिलेचा कमरेखालचा भाग आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी पंचनामा करून मृत महिलेच्या कमरेखालचा भाग विच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात नेला असून शिराचा व धडाच्या भागाचा पोलीस शोध घेत आहेत.

हत्येचे टिटवाळा कनेक्शन?

मृतदेह सुटकेसमध्ये भरून घेऊन येणाऱया व्यक्ती कल्याण रेल्वे स्टेशनमधील सीसीटी व्हीमध्ये कैद झाल्या आहेत. काळी सुटकेस घेऊन तोंडाला टॉकेल गुंडाळून मारेकरी फलाट एकमध्ये उतरून स्टेशनच्या बाहेर पडताना फुटेजमध्ये दिसतात. सुटकेस घेतलेल्या व्यक्तीसोबत आणखी दोघे असण्याची शक्यता आहे. दरम्यान हे मारेकरी टिटवाळा स्टेशनमध्ये चढल्याचे धागेदोरे पोलिसांना मिळाले आहेत. मारेकऱयांच्या तपासासाठी पोलिसांनी चार पथके स्थापन केली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या