
कल्याणच्या चिकणीपाड्यात आज सप्तश्रृंगी इमारत कोसळून सहा जणांचा हकनाक बळी गेला. धक्कादायक म्हणजे 40 वर्षे जुनी जीर्ण झालेली ही इमारत कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या धोकादायक यादीतच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्रशासनाच्या बेपर्वाईचे हे बळी असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी येथे धाव घेत शर्तीचे प्रयत्न करत ढिगाऱ्याखालून 12 रहिवाशांना बाहेर काढले. मात्र दीड वर्षाच्या चिमुकलीस सहा जणांचा मृत्यू झाला असून या दुर्घटनेने क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रनगर चिकणीपाडा येथे सप्तश्रृंगी इमारत आहे. तळमजल्यासह चार मजली असलेली ही इमारत अत्यंत जुनी आहे. या इमारतीत सुमारे 50 कुटुंबे राहात होती. ही इमारत धोकादायक अवस्थेत होती. आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास इमारतीचा चौथ्या मजल्यावरील स्लॅब पत्त्याप्रमाणे कोसळला. प्रत्येक मजल्यावरील घराच्या स्लॅबला फोडत तो तळमजल्यावर कोसळला. या दुर्घटनेत 12 जण इमारतीमध्ये अडकले होते. चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर बाराही जणांना बाहेर काढले.
काम सुरू असतानाच दुर्घटना
सप्तश्रृंगी इमारत इमारत धोकादायक इमारतींच्या यादीत नव्हती. मात्र पावसाळ्याच्या पाश्र्वभूमीवर या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यास सांगितले होते. या इमारतीच्या डागडुजीचे काम सुरू होते. जो भाग कोसळला त्यात भागातील चौथ्या माळ्यावर फ्लोरिंगवर लाद्या बसवण्याचं काम सुरू होत. याचदरम्यान ही दुर्घटना घडली.
काही धोकादायक इमारतींमधील रहिवासी नोटिसा बजावूनही घरे रिकामी करण्यास तयार होत नाहीत. तर काही इमारतींची प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने या इमारती रिकाम्या करण्याचे आव्हान पालिकेसमोर आहे.
काही जमीनमालकांच्या आडमुठ्या धोरणामुळे रहिवासी आधी आमचे पुनर्वसन करा मगच आम्ही घरे रिकामी करतो, अशी भूमिका घेत आहेत. त्यामुळे हजारो रहिवासी जीव मुठीत घेऊन धोकादायक इमारतींमध्ये राहत आहेत.
मृतांची नावे : नमस्वी शेलार (दीड वर्षे), प्रमिला साहू (58), सुनीता साहू (37), सुजाता पाडी (32), सुशीला गुजर (78), व्यंकट चव्हाण (42) यांचा मृत्यू झाला.