
कल्याण पश्चिमेच्या बैलबाजार परिसरात केडीएमसीची मुख्य जलवाहिनी मंगळवारी फुटली. यामुळे शहरातील पाणीपुरवठा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होऊन पाणीटंचाई निर्माण झाली. शिवाय शिक्षणावरही परिणाम झाला. जलवाहिनी दुरुस्तीसाठी बैलबाजार परिसरातील के.सी. गांधी शाळा बुधवार ते शुक्रवार सलग तीन दिवस बंद ठेवावी लागली. यामुळे तब्बल तीन हजार विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम झाला.
कल्याण मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असलेल्या बैलबाजार भागातच ही जलवाहिनी आहे. मंगळवारी कामादरम्यान ती फुटल्याने पाणीबाणी निर्माण झाली. यामुळे जलवाहिनी दुरुस्तीसाठी बैलबाजार ते गुरुदेव हॉटेलकडे जाणारा मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करावा लागला. परिणामी नागरिकांसोबतच शालेय विद्यार्थ्यांचीही मोठी गैरसोय झाली. के.सी. गांधी शाळा या मुख्य मार्गालगत असल्याने शाळेत विद्यार्थ्यांना आणणाऱ्या बसेसची वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे सुरक्षितरीत्या विद्यार्थ्यांचे शाळेत आगमन शक्य नसल्याने शाळा प्रशासनाने बुधवारपासून आजपर्यंत शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. आज जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्याने उद्यापासून शाळा पूर्ववत सुरू होईल.
रस्ता बंद असल्याने मनस्ताप
सध्या परीक्षा हंगाम सुरू आहे. शिवाय अनेक सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. मात्र रस्ता बंद असल्याने सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागल्याचे शाळेच्या संचालिका स्वप्नाली रानडे यांनी सांगितले.


























































