मटण-चिकन विक्रेत्यांचा कल्याणमध्ये कोंबडी मोर्चा, महापालिका मुख्यालयावर आंदोलकांची चिकनफेक

स्वातंत्र्यदिनी मटण-चिकन विक्रीची दुकाने बंद ठेकण्याच्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आदेशाविरोधात मटण-चिकन विक्रेत्यांच्या संतापाचा भडका उडाला. शेकडो मटण-चिकन विक्रेत्यांनी हातात कोंबडय़ा घेऊन पालिका मुख्यालयावर मोर्चा काढत प्रशासन आणि आयुक्तांच्या हुकूमशाही निर्णयाचा जाहीर निषेध केला. यावेळी आंदोलकांनी गेटवरून पालिका मुख्यालय इमारतीत कोंबडय़ा फेकल्या.

मटण-चिकन विक्री बंदीचा निर्णय तत्काळ मागे घ्या अन्यथा 15 ऑगस्ट रोजी महापालिका मुख्यालयाबाहेर मटण-चिकन विक्री करू, असा इशारा विक्रेत्यांनी दिला होता. मात्र पालिका प्रशासन ठाम राहिल्याने आज सकाळी कल्याण खाटीक संघटनेच्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस पदाधिकाऱयांनी हातात कोंबडय़ा घेऊन महापालिका मुख्यालयावर धडक दिली. यावेळी हिंदू खाटीक समाजाचे शिरीष लासुरे, परवेज शेख, हासिफ शेख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, शिवसेनेचे विधानसभा सहसंघटक रुपेश भोईर, माजी नगरसेवक नवीन सिंग, कांचन कुलकर्णी आदी आंदोलनात सहभागी झाले होते.

आव्हाडांची मटण-चिकन पार्टी

बंदी आदेशाचा निषेध करत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज मटण-चिकन पार्टी ठेवली. कल्याणमधील जय मल्हार उपाहारगृहात हे स्नेहभोजन आयोजित केले होते. यावेळी सर्वांनी मटण-चिकन, भाकरी आणि माशांवर ताव मारला. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख बाळा परब, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे, राजाभाऊ पातकर आदी उपस्थित होते.

आयुक्त कुणाची तळी उचलत आहेत?

या आंदोलनाचा धसका घेऊन पालिका कार्यालयापासून 100 मीटर परिसरात वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली होती. चिकन-मटण विक्रेत्यांनी हातात कोंबडय़ा घेऊन पालिकेच्या गेटवर धडक देताच पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यामुळे संतापलेल्या आंदोलकांनी गेटवरूनच पालिका इमारतीच्या दिशेने कोंबडय़ा भिरकावल्या. आम्ही न्याय मागणीसाठी आंदोलन करत असताना पोलिसांनी बळाचा वापर करून आम्हाला रोखले. पालिका आयुक्त कुणाची तळी उचलून आमच्या रोजीरोटीवर गदा आणत आहेत, असा संतापही यावेळी मटण-चिकन विक्रेत्यांनी केला.