
कल्याण आरटीओ कार्यक्षेत्रात तब्बल २५ हजार रिक्षा आहेत. मात्र कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ परिसरात रिक्षाचालक मीटरऐवजी शेअर किंवा मनाला येईल ती रक्कम घेऊन प्रवाशांची लूट करत आहेत. २६ रुपये किमान भाडे असताना मीटर बंद असल्याचे सांगून जवळच्या अंतरासाठीही ४० रुपये आकारून ‘पाकीट’मारी करत आहेत. शिवाय शेअर रिक्षामध्ये तीन प्रवाशांची क्षमता असताना पाच प्रवासी कोंबून धोकादायक प्रवास केला जात आहे. रेल्वे स्टेशन परिसरातून मीटर आणि प्रीपेड रिक्षा सेवा सुरू करण्याची सातत्याने प्रवासी मागणी करत असूनही आरटीओ दुर्लक्ष करत असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर कार्यक्षेत्रात रिक्षांची भाडे आकारणी मीटरप्रमाणे करण्याची प्रवाशांची सातत्याने मागणी आहे. या परिसरातील सर्व मार्गांवर शेअर रिक्षांद्वारे वाहतूक केली जाते. मीटर रिक्रॅलिब्रेशननंतर रिक्षाचे किमान भाडे २३ वरून २६ रुपये झाले. याशिवाय हकीम समितीने शेअर रिक्षांच्या भाड्यात ३३ टक्के अतिरिक्त भाडेवाढ केली आहे. यामुळे प्रवाशांना अतिरिक्त ११ टक्के टक्के भाडेवाढीचा भुर्दंड सोसावा लागत आहे. अतिरिक्त भाडेवाढीबद्दल ग्राहक संरक्षण कक्ष, प्रवासी संघटना यांच्यासोबत समितीने चर्चा केली नाही. परिणामी भाडेवाढीचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे.
… अन्यथा परवाने रद्द करा!
रिक्षाचालकांच्या मनमानीमुळे होणारी प्रवाशांची लूट लक्षात घेऊन ग्राहक संरक्षण कक्षाच्या कल्याण पूर्व कक्ष शहर संघटक ऋतुकांचन रसाळ यांनी आज कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांची भेट घेऊन निवेदन दिले. जे रिक्षाचालक मीटरप्रमाणे भाडे आकारणी करणार नाहीत त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. रेल्वे स्टेशन परिसरात केवळ मीटरप्रमाणे भाडे आकारणी करणाऱ्या रिक्षांनाच थांबा देण्यात यावा अशीही मागणी त्यांनी केली.