मी शिवसेना बोलतेय…कल्याणमध्ये गद्दारांना ठोकणारा देखावा पोलिसांनी केला जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सव म्हणजे समाज प्रबोधनाचे व्यासपीठ. मात्र ‘पन्नास खोके एकदम ओके’त रमलेल्या ‘ईडी’ सरकारला ते मान्य नसल्याचे समोर आले आहे. कल्याणमध्ये 59 वर्षांची वैभवशाली परंपरा असणाऱया विजय तरुण मंडळाने गद्दारांना ठोकणारा आणि निष्ठsवर आधारित ‘मी शिवसेना बोलतेय’ हा चलचित्र देखावा तयार केला. मात्र ‘खोके’ पचवणाऱया ईडी सरकारला हा पंचनामा हजम झाला नाही आणि देखावा खुला होण्याआधीच दंडेलशाही करत पोलिसांनी तो जप्त केला. पोलिसांच्या तुघलकी कारवाईविरुद्ध कल्याणमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मंडळावर कारवाई होताच नागरिकांनी महाआरती करून शिंदे-फडणवीस सरकारचा तीव्र निषेध केला.

विजय तरुण मंडळाने यंदा निष्ठेवर आधारित ‘मी शिवसेना बोलतेय’ हा चलचित्र देखावा तयार केला होता. गेल्या महिनाभरापासून समाज माध्यमावर या देखाव्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यामुळे देखावा कधी खुला होणार याची सर्वांना उत्सुकता होती. गणेश चतुर्थी दिवशी मूर्ती प्रतिष्ठापना झाल्यानंतर हा देखावा खुला होणार असल्याचे मंडळाने जाहीर केले होते. मात्र बंडखोरी करून शिवसेनेशी गद्दारी करणाऱयांना हा देखावा प्रदर्शित होणे रुचणारे नव्हते. त्यामुळे एका रात्रीत सूत्रे हालली आणि देखावा जप्त करण्याचे आदेश पोलिसांना मिळाले.

हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकवटले

पोलिसांच्या या कारवाई निषेधार्थ कल्याणमधील हिंदुत्ववादी कार्यकर्ते, गणेशभक्त आणि शिवसैनिक एकवटले. सरकारच्या निषेधार्थ आज महाआरती करण्यात आली. यावेळी भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख रूपेश म्हात्रे, म्युन्सिपल कामगार कर्मचारी सेनेचे अध्यक्ष बाळ हरदास, महानगरप्रमुख विजय साळवी, शहरप्रमुख सचिन बासरे, शरद पाटील, धनंजय बोराडे आदी उपस्थित होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

पहाटे तीन वाजता 300 पोलीस धडकले

रामबाग परिसरात विजय तरुण मंडळाच्या सार्वजनिक गणपतीच्या मंडपात चलचित्र देखाव्याची मांडणी केली होती. गणेश चतुर्थीला पहाटे तीन वाजता दंगलविरोधी पथकासह 300 पोलिसांच्या फौजफाटय़ासह वरिष्ठ पोलीस अधिकारी मंडपात धडकले. मंडळाचे विश्वस्त आणि शिवसेना महानगरप्रमुख विजय साळवी यांच्याही घरी पोलीस पोहोचले आणि मंडळाचा देखावा जप्त करत असल्याचे त्यांना सांगितले. साळवी मंडपात पोहचण्यापूर्वीच पोलिसांनी चलचित्रांसह सर्व साहित्य जप्त केले होते.

पापाचा घडा भरणार

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सरकारने घातलेला हा घाला आहे. एक प्रकारे हिटलरशाही आहे. तिचा आम्ही निषेध करतो. काहीही वादग्रस्त नसतानाही मंडळावर गुन्हा दाखल करून देखावा जप्त केला आहे. आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. हे सरकार जेवढी पापं करेल तेवढा त्यांच्या पापाचा घडा भरणार हे निश्चित. पोलीस कारवाईचा निषेध म्हणून आम्ही गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली नाही.

विजय साळवी, शिवसेना महानगरप्रमुख.