
कमलेश तिवारी हत्या प्रकरणात मारेकऱयांनी केलेल्या कटाची माहिती आता बाहेर आली आहे. तिवारी यांच्या हत्येतील एका मारेकऱयाने बनावट आधारकार्ड तयार केले आणि तो तिवारी यांच्या पक्षाचा प्रचारक बनला. दिवाळीची मिठाई देण्याच्या बहाण्याने सूरतहून उत्तर प्रदेशमध्ये आले आणि तिवारींची हत्या केली.
दोघांपैकी अशफाक शेख हा एका फॉर्मासिटिकल कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम करत होता. तिवारी यांची हत्या करण्यासाठी त्याने आपल्या ऑफिसमधील एका हिंदू सहकाऱयाचे, रोहित सोलंकी याचे आधारकार्ड चोरले. त्यावर आपला फोटो लावला, त्यावरील जन्मतारिखही बदलली आणि तो तिवारी यांच्या सूरतमधील हिंदू समाज पक्षात प्रचारक म्हणून सहभागी झाला. पक्षाचे गुजरात प्रमुख जैमिन दवे यांच्याशी त्याने संपर्क वाढवला, त्यांचा विश्वास जिंकला. दिवाळीची मिठाई देण्याच्या बहाण्याने त्याने आणि त्याच्या साथीदाराने तिवारी यांची भेट घेतली आणि त्यांची हत्या केली. दरम्यान, या दोघा मारेकऱयांच्या संपर्कात असलेल्या उत्तर प्रदेशमधील मौलानाला आज पोलिसांनी अटक केली.

























































