देशद्रोह्याला आमच्यात स्थान नाही, प्रचारासाठी आलेल्या कन्हैयाला गावकऱ्यांनी रोखले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बिहारमधील बेगूसराय येथून निवडणूक लढवणाऱ्या कन्हैया कुमारला स्थानिकांचा विरोध वाढत आहे. बेगूसराय लोकसभा मतदारसंघातील रामदीरी गावातील लोकांनी कन्हैया कुमारचा प्रचार रोखला आहे. आमच्या गावामध्ये द्रेशद्रोह्यांसाठी कोणतेही स्थान नाही असे गावकऱ्यांनी म्हटले आहे.

कन्हैया कुमार कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाच्या (सीपीआय) तिकीटावरून बेगुसराय येथून निवडणूक लढवत आहे. ‘आज तक‘ने दिलेल्या वृत्तानुसार, बेगूसरायमध्ये कन्हैयाला विरोध वाढत चालला आहे. कन्हैयाला गावकरी गावामध्ये प्रवेशही करू देत नाहीयेत. रामदीरी गावातही असाच प्रकार घडला. येथील लोकांनी कन्हैयाची गाडी गावात घुसू दिली नाही आणि त्याच्याविरोधात घोषणाबाजी केली.

सीपीआयकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कन्हैयाने काही दिवसांपूर्वी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी अनेक बडे नेते त्याच्यासोबत उपस्थित होते. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर, गुजारातचा आमदार जिग्नेश मेवाणी, शहला रशिद हे देखील यावेळी उपस्थित होते. निवडणुकीसाठी कन्हैयाने लोकांकडून ऑनलाईन पैसेही पाठवण्याचे आवाहन केले आहे.

बेगूसरायमध्ये कन्हैयासमोर भारतीय जनता पक्षाचे गिरिराज सिंह यांचे आव्हान असणार आहे. गिरिराज सिंह यांनी केंद्रात मंत्री असतानी आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी लक्ष वेधून घेतले आहे. येथे 29 एप्रिलला मतदान होणार आहे.