कन्हैयाकुमार, जिग्नेश मेवानी काँग्रेसमध्ये; राहुल गांधींच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते कन्हैया कुमार आणि गुजरातमधील अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी अखेर कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला. कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

शहीद भगतसिंग यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून या दोघांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे बिहार आणि गुजरातमध्ये कॉँग्रेसला नवं बळ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मेवानी यांनी काँग्रेसचे सदस्यत्व स्वीकारलेले नाही. मी अपक्ष आमदार आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर आमदार म्हणून काम करू शकणार नाही, असे मेवानी म्हणाले. अर्थात, पुढील निवडणुकीत काँग्रेसकडूनच मैदानात उतरेन, असे त्यांनी सांगितले.

देशाला कॉँग्रेसच वाचवू शकते – कन्हैया कुमार

पंतप्रधान फक्त नावाला आहेत. देशाला फक्त काँग्रेसच वाचवू शकते. जर काँग्रेस वाचली नाही तर देश वाचणार नाही. आज जेव्हा आम्ही राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षप्रवेशाचा अर्ज भरत होतो तेव्हा जिग्नेश यांनी त्यांना संविधानाची प्रत भेट दिली आणि मी त्यांना भगतसिंग, गांधी आणि आंबेडकरांची प्रतिमा दिली. कारण आज या देशाला आंबेडकरांच्या समानतेची, भगतसिंगांच्या शूरतेची आणि गांधीच्या एकतेची गरज आहे, असे कन्हैया कुमार याने पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.