तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा करून मोदी त्यांना विकसित हिंदुस्थानचा चष्मा विकताहेत; पेपरफुटीवरून कन्हैया कुमार यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणी सीबीआयची धडक कारवाई सुरू असून आतापर्यंत 13 जणांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सीबीआयने बुधवारी आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे पेपरफुटी प्रकरणाची व्याप्ती वाढतच चालली आहे. अर्थात पेपरफुटीचे हे एकमेव प्रकरण नसून याआधीही विविध परीक्षांचे पेपर फुटून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. याच प्रकरणावरून आता काँग्रेस नेते आणि एनएसयूआयचे प्रभारी कन्हैया कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

एनएसयूआय आणि यूथ काँग्रेस संपूर्ण देशभरात पेपरफुटीवरून रस्त्यावर उतरली असून विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरला आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी मौन आहेत. मोदींनी आता मौन सोडावे आणि शिक्षणासाठी अयोग्य असलेल्या शिक्षण मंत्र्यांवर कारवाई करावी. मोदींनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी कन्हैया कुमार यांनी केली.

बातमी अपडेट होत आहे…

ते पुढे म्हणाले की, पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठी कठोर कायदा आणावा. देशभरातील पेपरफुटीच्या घटनांमुळे देशाचे भविष्य असणाऱ्या तरुणांचे गळा दाबला जात आहे. तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा करून, त्यांना कैद करून, त्यांचा आवाज दाबून तुम्ही विकसित हिंदुस्थानचा चष्मा विकत आहात. हिंदुस्थान विकसित तेव्हाच होईल जेव्हा देशातील तरुणांना चांगले शिक्षण मिळेल, शिक्षित तरुणांना रोजगार मिळेल आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल.

अर्थव्यवस्था मजबूत झाली की देश मजबूत होईल. तेव्हाच आपण विश्वगुरू होऊ. भाजप, आरएसएसशी संबंध असणाऱ्या पेपर फोडणाऱ्या लोकांमुळे देश विश्वगुरू होऊ शकत नाही. व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवणाऱ्या देशद्रोही, पाकिस्तानी ठरवले जात असून हे योग्य नाही, असेही कन्हैया कुमार म्हणाले.

मोदी परीक्षा पे चर्चा करतात आणि रील बनवतात. पण पेपरफुटीनंतर मौन का आहात? तसेच आपले खाते सोडून जगभरातील प्रत्येक गोष्टींवर बोलणारे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा कधी घेणार? असा सवालही कन्हैया कुमार यांनी केला.