कानिफनाथ महाराजांच्या आरतीला विरोध झाल्याने तणाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सालाबादप्रमाणे अमावास्येनिमित्त गुहा येथील कानिफनाथ मंदिरात होणाऱया आरती तसेच महाप्रसादाला गावातीलच एका गटाने विरोध दर्शविल्याने वातावरण तणावपूर्ण बनले होते.

गुहा गावात अमावास्यानिमित्ताने गेल्या अनेक वर्षांपासून गावातील ग्रामस्थांकडून कानिफनाथ मंदिरात आरती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. मात्र, शनिवारी गावातील एका गटाने या धार्मिक कार्यक्रमाला विरोध दर्शवून संपूर्ण गावालाच वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ग्रामस्थ मोठय़ा संख्येने कानिफनाथ मंदिरात जमले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे फौजफाटय़ासह गुहा येथे दाखल झाले. कानिफनाथांची आरती व महाप्रसाद कार्यक्रम करण्याच्या भूमिकेवर गावकरी ठाम असताना दुसऱया गटाने घोषणा देऊन वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, ग्रामस्थांनी कानिफनाथ मंदिरात आरती करून महाप्रसादाचे वाटप केले. दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे गुहा गावात होणारा मोठा अनर्थ टळला.

गेल्या अनेक वर्षांपासून गुहा गावामध्ये कानिफनाथ महाराजांची यात्रा सर्व ग्रामस्थ एकत्रितपणे साजरी करीत असल्याची जुनी परंपरा आहे. कानिफनाथ महाराजांची आरती भाविक श्रद्धेने करीत असतील, तर कुणालाही विरोध करण्याचे कारण नाही. गावाला वेठीस धरून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम कुणी करीत असेल, तर ते सहन केले जाणार नाही, अशा संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.