कन्नमवारनगरमधील म्हाडाच्या सतरा इमारती सीआरझेडमधून वगळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

विक्रोळीच्या कन्नमवार नगरधील म्हाडाच्या सतरा जुन्या मोडकळीस आलेल्या इमारती सीआरझेड क्षेत्रात येत असल्यामुळे त्यांचा पुनर्विकास रखडला आहे. त्यामुळे या इमारती सीआरझेडमधून वगळण्याची मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार सुनील राऊत यांनी आज विधानसभेत केली.

विधानसभेत हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे सुनील राऊत यांनी कन्नमवार नगरमधील इमारतींच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, माझ्या मतदारसंघातील कन्नमवार नगरात 50-60 वर्षांपूर्वी बांधलेल्या म्हाडाच्या जुन्या इमारती आहेत. या सर्व इमारती जुन्या व मोडकळीस आलेल्या आहेत. या इमारतींपैकी सतरा इमारती सीआरझेड क्षेत्राने बाधित आहेत. त्यामुळे या इमारतीच्या पुनर्विकासाचा मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. माझी सरकारला विनंती आहे की, या इमारतींमधील रहिवासी अडचणीत व जीव मुठीत घेऊन राहत आहेत. या इमारती सीआरझेडमधून वगळून पुनर्विकासाच्या बाबतीत सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी यावेळी सुनील राऊत यांनी केली.