कानपूरच्या भूतेश्वर मंदिरात राडा; मांसाहार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने महंतांना जमावाची मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कानपूरमधील रावतपूर भागातील प्रसिद्ध भूतेश्वर मंदिराच्या महंतांना मांसाहार करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतप्त स्थानिकांनी जबर मारहाण केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी मध्यस्थी करत महंतांची जमावाच्या तावडीतून सुटका केली.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत गिरी ऊर्फ गोलू पंडित असे या महंताचे नाव असून ते मंदिर परिसरातील एका खोलीत वास्तव्यास आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा एक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता, ज्यामध्ये ते मांसाहारी जेवण करताना दिसून आले. एका पवित्र मंदिराच्या महंताने अशा प्रकारे वर्तन केल्यामुळे स्थानिक भाविक आणि रहिवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती. रविवारी रात्री उशिरा महंत प्रशांत गिरी हे मंदिर परिसरात असताना, संतप्त लोकांचा एक गट तिथे पोहोचला. व्हिडिओचा जाब विचारत या लोकांनी महंतांना मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या काहींनी या मारहाणीचा व्हिडिओही केला. या घटनेची माहिती मिळताच रावतपूर पोलिसांनी तातडीने धाव घेत महंतांना गर्दीतून बाहेर काढले आणि पोलीस ठाण्यात नेले. या हल्ल्यात महंत जखमी झाले असून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.


रावतपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी कमलेश राय यांनी सांगितले की, पीडित महंताला जमावापासून सुरक्षित वाचवण्यात आले असून त्यांच्या तक्रारीवरून तपास सुरू आहे. व्हायरल व्हिडिओच्या आधारे मारहाण करणाऱ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून, दोषींवर कडक कारवाई केली जाईल असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.