
उत्तरप्रदेशात एक अनोखी घटना घडली आहे. प्रियकराने बोलणे बंद केल्याने अल्पवयीन प्रेयसी 700किमी अंतर कापून प्रियकराकडे पोहोचली. मात्र एवढे करुनही प्रियकराने भेटायला नकार दिल्याने प्रेयसीने टोकाचे पाऊल उचलत पोलीस स्थानकात धाव घेतली.
पोलीस स्थानकात पोहोचल्यावर ती अल्पवयीन मुलगी बेशुद्ध झाली. तिची हालत गंभीर होती. पोलिसांनी तिला तत्काळ रूग्णालयात दाखल करुन उपचार सुरू केले. ही घटना मंगलपूर परिसरातील झींझक कस्बे येथील आहे. झींझक कस्बे येथे राहणारा एक तरुण मध्य प्रदेशातील इंदूर शहरात खासगी नोकरी करत होता. त्यावेळी त्याची मैत्री एका अल्पवयीन मुलीसोबत झाली. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर तरुण तिथून आपल्या घरी झींझक येथे परतला. त्याने त्याच्या प्रेमाविषयी घरच्यांना सांगितले मात्र घरच्यांनी त्याच्या प्रेमाला नकार दिला आणि मुलीशी बोलणे बंद करण्यास सांगितले. घरच्यांचे म्हणणे मान्य करुन तरुणाने तिच्याशी बोलणे बंद केले.
प्रियकराने अचानक बोलणे बंद केल्याने मुलगी काळजीत पडली. अनेकदा प्रयत्न करुनही तो बोलत नसल्याने अखेर तिने थेट त्याच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला. शनिवारी ती आपल्या प्रियकराला शोधत इंदूरहून 700 किमी दूर उत्तर प्रदेशातील कानपुर देहात झींझक येथे पोहोचली. ती त्याच्या घरी पोहोचल्यावर त्याने तिला भेटण्यास नकार दिला. तिला असं बोलल्यावर प्रचंड धक्का बसला आणि तिने ब्लेडने आपल्या हाताची नस कापून जीव देण्याचा प्रयत्न केला. हाताची नस कापल्यानंतर ती मुलगी पोलीस स्थानकात गेली. रक्तबंबाळ हात घेऊन पोलीस स्थानकात आलेल्या मुलीला काही विचारण्या आतच ती बेशुद्ध पडली. त्यानंतर महिला पोलिसांच्या मदतीने तिला रूग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार केल्यानंतर पोलिसांनी तिची चौकशी केली. त्यानंतर घाबरलेली तरुणी तिथे कोणाला काही न बोलता बेपत्ता झाली. आता पोलीस तिचा शोध घेत आहेत. पोलीस तिच्या प्रियकराची चौकशी करत आहेत.


























































