हिंदुस्थानी संघाला दोन कर्णधार नकोत, कपिलदेव यांचे स्पष्ट मत

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाचव्यांदा आयपीएल जिंकण्याची करामत करून दाखवली. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला अद्याप एकदाही आयपीएल जिंकता आलेली नाही. यामुळे हिंदुस्थानात नेतृत्वबदलाचे वारे वाहू लागले. कसोटी आणि वन डे, टी-20 या दोन्ही प्रकारांत भिन्न कर्णधार असायला हवेत असा सूरही यावेळी उमटू लागला. याप्रसंगी हिंदुस्थानचे माजी अष्टपैलू खेळाडू व कर्णधार कपिलदेव म्हणाले, हिंदुस्थानी संस्कृतीत नेतृत्वाचे विभाजन चालणार नाही. दोन कर्णधार आपल्या देशाला नकोत.

कपिलदेव पुढे म्हणाले, एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये दोन सीईओ कसे काय पदावर राहू शकतात? विराट कोहली टी-20 खेळत असेल तर तोच कर्णधार असायला हवा. इतर खेळाडू कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करीत आहेत, पण हिंदुस्थानी संस्कृतीत कर्णधारपदाचे विभाजन चालू शकत नाही.

चेंडू स्विंग करायला यायलाच हवा
या जनरेशनच्या वेगवान गोलंदाजांवरही कपिलदेव भडकले. ते म्हणाले, आताच्या काळात पहिलाच चेंडू क्रॉस सीम टाकला जातो. हे योग्य नाहीए. संदीप शर्मा याच्या चेंडूचा वेग जास्त नसूनही त्याने चेंडू स्विंग करीत आयपीएल स्पर्धा गाजवलीय. बॉब विलीस, इयान बॉथम, रिचर्ड हॅडली. वासीम अक्रम, ग्लेन मॅग्रा यांनी चेंडू स्विंग करीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दबदबा निर्माण केलाय. आताच्या युवा खेळाडूंनाही ते समजायला हवे. टी. नटराजन या युवा खेळाडूनेही आयपीएलमध्ये कोणताही दबाव न घेता भन्नाट यॉर्कर टाकेल. त्याने मला प्रभावित केले, असेही कपिलदेव म्हणाले.

मतभेद होतील
कसोटी, वन डे व टी-20 या तिन्ही प्रकारांत हिंदुस्थानचा जवळपास एकच संघ असतो. म्हणजे 80 टक्के खेळाडू सेमच असतात. अशा परिस्थितीत दोन भिन्न कर्णधार असल्यास मतभेद निर्माण होऊ शकतात, असे कपिलदेव यांना वाटते. खेळाडू मैदानात कामगिरी करताना समोर कोणता कर्णधार याचाही विचार करू लागतील. हा खेळाडू कसोटी संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याला त्रास देता येणार नाही असा विचार क्रिकेटपटूंच्या मनामध्ये येईल, असेही कपिलदेव यावेळी म्हणाले

आपली प्रतिक्रिया द्या