
बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठल्यानंतर कराड तालुक्यात कोळे येथे बैलगाडा शर्यतीचा थरार पुन्हा अनुभवायला मिळाला. स्पर्धेने लक्षणीय गर्दीच्या डोळ्याचे पारणे फेडले. अंतिम फेरीत चुरशीच्या क्षणी सैदापूर येथील खाशाबा दाजी शिंदे या गाडीने प्रथम क्रमांकाचे 25 हजार 555 रुपये रोख बक्षीस व मानाची गदा पटकावली. या स्पर्धेत 150हून अधिक स्पर्धक स्पर्धेत उतरले होते.
राज्यासह जिह्यातच बैलगाडा शर्यतीची परंपरा पुन्हा सुरू झाली आहे. शर्यतींना उधाण आले आहे. कराड तालुक्यात बैलगाडा स्पर्धेचे आयोजन कोळेत प्रथम झाले. श्री घाडगेनाथ महाराज वार्षिक यात्रेच्या औचित्य साधून तब्बल आठ वर्षांनी बैलगाडा शर्यतीचा थरार कोळेत अनुभवायला मिळाला. तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार आनंदराव देवकर, सहायक पोलीस निरीक्षक रेखा दुधभाते यांच्या हस्ते स्पर्धेला प्रारंभ झाला. सरपंच संगीता कराळे, उपसरपंच समाधान शिनगारे, यात्रा समिती अध्यक्ष सूर्यकांत कुंभार, उपाध्यक्ष मुनीर भोजगर व यात्रा समिती सदस्य उपस्थित होते.
शर्यतीच्या अंतिम फेरीत सैदापूरच्या खाशाबा शिंदे यांच्या गाडीने प्रथम क्रमांक मिळवला. दोन ते सहा क्रमांकाचे विजेते स्पर्धक अनुक्रमे पुढीलप्रमाणे- देवराज पाटील (सुपने), महम्मद मुजावर (विंग), देवराज पाटील (सुपने), अनिकेत माने (गोंदी) व दरबार हाटेल (करवडी-भाटवडे) यांना 21 हजार 111 रुपये, 15 हजार 555 रुपये, 11 हजार 111 रुपये, 9 हजार 999 रुपये, 7 हजार 777 रुपये रोख बक्षिसे व मानाची गदा देऊन गौरविण्यात आले.
असलम देसाई, विकास पाटील, अर्जुन कराळे, मुन्ना भोजगर, अंकुश पाटील, उत्तम पाटील, जावेद फकीर यांनी पंच म्हणून काम पाहिले. महपूज फकीर व नथुराम शिनगारे, मोहनिश चव्हाण यांनी झेंडापंच म्हणून काम पाहिले. रणजित बनसोडे, बबलू देसाई यांनी सूत्रसंचालन केले. तळमावले येथील शिवसमर्थ मल्टिस्टेट को- सोसायटी, अविनाश पाटील, श्रीधन ऍग्रो इंडस्ट्रीज पुणे, रामचंद्र देशमुख व राजकुमार पाटील अंबवडे, आप्पासाहेब देसाई व नंदकुमार कांबळे यांनी बक्षिसासाठी सहकार्य केले.
























































