कराड मंडई परिसरात कोम्बिंग ऑपरेशन, दीड किलो गांजा जप्त; दोघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने कराडच्या मंडईत अचानक राबवलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये दीड किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक करून एक दुचाकी जप्त केली आहे. दोन दिवसांपूर्वीच पोलिसांनी सव्वा किलो गांजा जप्त केला होता.

कराडचे उपनिरीक्षक राजू डांगे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंडई परिसरात अचानक कोम्बिंग ऑपरेशन राबवून सराईत गुन्हेगारांच्या घराची झाडाझडती घेतली. यात रेकॉर्डवरील गुन्हेगार गणेश संजय वायदंडे व संदीप संपत बडेकर ऊर्फ बारक्या बडेकर हे दुचाकीवरून गांजाची वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याकडून सुमारे दीड किलो गांजा व दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सदर कारवाईत आरोपी गणेश वायदंडे व संदीप बडेकर यांना अटक केली आहे. पोलीस पथकाने यावेळी दारू पिवून वाहन चालवणाऱया चौघांवर कारवाई करत 20 हजारांचा दंड वसूल केला.

उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले, राजू डांगे, प्रवीण जाधव, संजय देवकुळे, शशी काळे, संतोष पाडळे, कुलदिप कोळी, महेश शिंदे, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, अमोल देशमुख, सोनाली पिसाळ यांनी ही कारवाई केली.

यापुढेही अशाप्रकारे जिल्ह्यात कारवाई करण्यात येणार आहे. अमली पदार्थ तस्करांची कोणत्याही प्रकारे गय केली जाणार नाही. – समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा.