दरोडेखोरांच्या मारहाणीत दाम्पत्य गंभीर जखमी, 18 तोळ्यांचे दागिने लंपास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कराड तालुक्यातील मसूर येथे बुधवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास पडलेल्या सशस्त्र दरोडय़ात दरोडेखोरांनी केलेल्या जबर मारहाणीत दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. दरोडेखोरांनी घरातील जवळपास 18 तोळे सोन्याचे दागिने व 9 हजारांची रोकड असा लाखोंचा ऐवज लंपास केला. सुमारे अर्धा तास दरोडेखोरांचा हा धुमाकुळ सुरू होता. या दरोडय़ामुळे मसूर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संपत हिराप्पा कारे (वय 54, मूळ रा. कालगाव, ता. कराड), अनिता संपत वारे (वय 48) अशी जखमींची नावे आहेत.

मसूर बसस्थानक चौकापासून जवळच पंढरपूर रस्त्यावरील संतोषीमाता नगर येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संपत कारे व अनिता वारे हे बंगल्यातील बेडरूममध्ये झोपले असताना दरवाजाचा कडीकोयंडा तोडून पाच ते सहा दरोडेखोरांनी बंगल्यात प्रवेश केला. आवाजामुळे अर्धवट जाग आलेल्या डॉ. वारे यांना चोरटय़ांनी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मध्ये पडलेल्या अनिता वारे यांनाही जबर मारहाण करण्यात आली. दरोडेखोरांनी त्यांच्या अंगावरील व कपाटातील दागिने लुटून हॉलकडे मोर्चा वळवला.

हॉलमध्ये झोपलेल्या पुष्पा उत्तमराव जगदाळे यांना दरोडेखोरांनी मारून टाकण्याची धमकी दिल्याने घाबरून त्यांनी गळय़ातील सोन्याची मोहनमाळ व हातातील सोन्याची अंगठी काढून दिली. उशाला ठेवलेल्या पिशवीतील रोख नऊ हजार रुपये घेतल्यानंतर चोरटे वरच्या मजल्यावर गेले. वरच्या मजल्यावर बेडरूमध्ये डॉ. वारे यांचा मुलगा नितिराज व सून पूजा झोपले होते. दरोडेखोरांनी त्यांना मारून टाकण्याची धमकी देऊन तेथेही लूटमार केली. त्यानंतर खाली येऊन वारे यांच्या गाडीची काच फोडून चोरटे पसार झाले. वारे कुटुंबीयांनी पोलिसांना संपर्क साधताच थोडय़ा वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व जखमींना तातडीने कराडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी जिल्हा पोलीसप्रमुख अजय कुमार बन्सल, पोलीस उपअधीक्षक रणजित पाटील, उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी भेट दिली असून, श्कानपथकास पाचारण करण्यात आले होते.