
पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर उंब्रज (ता. कराड) गावच्या हद्दीत वाशी ते गोवा जाणारी खासगी मिनी बस एम. एच. 01 सी आर ९५६५ ही तारळी पूलाचा कठडा तोडून सुमारे चाळीस फूट तारळी नदीपात्रात कोसळली. या भीषण अपघातात पाच जण जागीच ठार झाले आहेत. तसेच सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली असून दिवाळीच्या पहाटे हा अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
शनिवारपहाटे साडे चारच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातग्रस्त गाडीतून चालकासह एकूण १३ जण प्रवास करत होते. या अपघातातील मृतांमध्ये एक महिला व तीन वर्षांच्या बालकासह अन्य तीन पुरुषांचा समावेश आहे. मधुसूदन गोविंदन नायर (वय४२),उषा मधुसूदन नायर (वय४०), आदित्य मधुसूदन नायर (वय२३) तिघे रा.सेक्टर १६ वाशी (नवी मुंबई),साजन एस नायर (वय३५) व आरव साजन नायर (वय वर्षे ३) रा.सेक्टर ४ कोपरखैरणे (नवी मुंबई) अशी अपघातात जागीच ठार झालेल्यांची नावे आहेत तर,दिव्या मोहन (वय३०), दिपा नायर (वय३२), लिला मोहन (वय ३५) ,मोहन बेलायदन ( वय५९),अर्चना नायर (वय१५),सर्व रा.सेक्टर १६ वाशी( नवीन मुंबई), सिजिन शिवदासन (वय२८),दिप्ती मोहन (वय२८) दोघे रा.सेक्टर ४ कौपरखैरणे वाशी, नवी मुंबई,चालक रिंकु विश्वनाथ साहू (वय३०) (रा.मध्यप्रदेश) अशी अपघातात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
तारळी नदीच्या दोन्ही पुलाच्या मध्यभागी असणाऱ्या रिकाम्या चौकोनातून ही मिनीबस सुमारे ५० फुट खाली कोसळली. यातील एक जखमी प्रवाशी बाहेर निसटल्याने हा अपघात पोलीस आणि स्थानिक नागरिकांना समजला. घटनास्थळी स्थानिक नागरिक व युवकांनी तसेच उंब्रज पोलिसांनी तातडीने मदत कार्य सुरू केले होते. जखमींना उपचारासाठी सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.




























































