कोळंबे येथे सापडली कराड रॉबरी प्रकरणातील स्कॉर्पिओ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । देवरुख

कराड येथील रोडरॉबरी प्रकरणातील स्कॉर्पिओ गाडी आरोपींनी रस्त्यातच सोडून पलायन केले. ही गाडी ताम्हाने-कोळंबे रस्त्यावर रात्री पोलिसांना आढळून आली. ही गाडी पोलिसांनी जप्त केली असून गाडीमध्ये तीन वेगवेगळ्या क्रमांकाच्या पाट्या आढळून आल्या. तसेच हुंडाई कारमधील रक्कम पोलिसांनी जप्त केली असून एकुण ४ कोटी ४८ लाख रुपये रक्कम सापडली आहे. ही गाडी, तीन आरोपी व रक्कम सातारा पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आली आहे.

कराड येथे मंगळवारी रोडरॉबरीची घटना घडली होती. यामध्ये साडेचार कोटींची रोकड घेवून जाणारे निवृत्त पोलीस अधिकारी व त्यांच्या सहकाऱ्याचे स्कॉर्पिओ गाडीसह अपहरण करुन दरोड्याचा खळबळजनक प्रकार घडला होता. या लुटमारीच्या नाट्यातील आरोपींच्या गाड्या या कोकणाच्या दिशेने आल्या. यानंतर जिल्हा पोलीस अलर्ट होवून ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती. शेवटी यामधील हुंडाई कार संगमेश्वर व देवरुख पोलिसांनी मंगळवारी रात्री ताब्यात घेतली होती. या कारमधील रक्कम व तीन आरोपी मिळाले होते. रात्री या सर्वांना संगमेश्वर पोलीस स्थानकात आणून चौकशी सुरु होती. तसेच या रक्कमेचे मोजमाप सुरु होते.

रात्री उशीरापर्यंत ही रक्कम मोजून पुर्ण झाली. एकुण ४ कोटी ४८ लाख रुपये मिळाले. लुटमारीची रक्कमही चार कोटी ५० लाख इतकी होती. मात्र २ लाख रुपये मात्र यामध्ये कमी दिसून आले. संगमेश्वर पोलीस स्थानकात रात्री जिल्हा पोलीस अधिक्षक प्रणय अशोक यांनी भेट देवून घटनेची माहिती घेत देवरुख व संगमेश्वर पोलिसांचे कौतुक केले. रात्री या रक्कमेचा पंचनामा करुन या बॅगा सिल करण्यात आल्या. रात्री उशीरा सातारा पोलीस संगमेश्वर पोलीस स्थानकात दाखल झाले. बुधवारी सकाळी संगमेश्वर पोलिसांनी पकडलेले तीन आरोपी, ही रक्कम व गाडी सातारा पोलिसांच्या ताब्यात दिली. हे सर्व घेवून पोलीस साताराकडे रवाना झाले.

संगमेश्वर तालुक्यात आरोपींच्या स्कार्पिओ व कॉलिस या दोन गाड्या दाखल झाल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी रात्रभर या गाड्या शोधण्याचे काम सुरु ठेवले. रात्री गस्त घालत असताना देवरुख पोलीसांना ताम्हाने-कोळंबे मार्गावर कोळंबे नजीक एक स्कॉर्पिओ गाडी थांबलेली दिसली. मात्र या गाडीमध्ये कोणीही नव्हते. सकाळी ही गाडी देवरुख पोलीसांनी ताब्यात घेतली. या गाडीमध्ये वेगवेगळ्या क्रमांकाच्या तीन नंबर प्लेट सापडल्या. गाडीतील व्यक्तींनी गाडी तिथेच टाकून पलायन केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. एकुण चार ते पाच असल्याचे सांगितले जात आहे. सध्या ही गाडी देवरुख पोलीसांच्या ताब्यात आहेत.