
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पीपीई कीट घालणे डॉक्टरांसह आरोग्यसेवकांना बंधनकारक आहे. मात्र संपूर्णतः पॅकबंद असलेले पीपीई कीट घालून सहा ते आठ तास सेवा देताना त्यांची चांगलीच दमछाक होते. गरमीमुळे अक्षरशः त्यांचा घामटा निघतो. आरोग्य कर्मचाऱयांचा हा त्रास कमी व्हावा यासाठी पीपीई कीटमध्ये हवा खेळती ठेवण्यासाठी कराडच्या विद्यार्थ्यांनी चक्क वातानुकूलित पीपीई कीटची निर्मिती केली आहे.
कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालनालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या प्रयत्नातून तयार झालेल्या या अनोख्या उपकरणामुळे पीपीई कीटमध्ये हवा खेळती राहणार असून पीपीई कीट परिधान करणाऱया डॉक्टरांच्या शरीराचे तापमान सामान्य राहण्यास मदत होणार आहे. मुख्य म्हणजे ही या पीपीई कीट वारंवार वापरता येते. या उपकरणात 0.1 मायक्रॉन आकाराचा हेपा फिल्टर बसविण्यात आला आहे. कोरोनाचा विषाणू हा यापेक्षा मोठय़ा आकाराचा असल्याने त्याचा शिरकाव या उपकरणाद्वारे पीपीई कीटमध्ये होऊ शकत नाही. कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाने विविध प्रकारची संशोधन केली असून त्यांची देशपातळीवर दखल घेतली आहे.
वजनाला हलके, हाताळण्यास सोपे
हे उपकरण वजनाला हलके असून, हाताळण्यास सोपे आहे. विषाणूजन्य साथीच्या आजारांच्या काळात उपचार करताना हे उपकरण त्यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे, असं शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निखिल भिसे या संशोधक विद्यार्थ्याने सांगितले आहे.




























































