
खरेदी केलेल्या प्लॉटची ऑनलाइन सात-बारा उताऱयावर नावदुरुस्ती करण्यासाठी 40 हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कराड शहराच्या तलाठय़ाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली. सागर दत्तात्रय पाटील (वय 32, रा. कराड) असे अटक केलेल्या तलाठय़ाचे नाव आहे.
तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांनी प्लॉट खरेदी केली आहे. ऑनलाइन सात-बारा उताऱयावर नावदुरुस्ती करायची असल्याने ते तलाठी सागर पाटील याला भेटले. कामाचे स्वरूप ऐकल्यावर तलाठय़ाने लाचेची मागणी केली. यामुळे तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक विक्रम पवार यांनी तक्रार घेऊन पडताळणीसाठी पथक नेमले. 8, 12 व 18 ऑगस्ट या तिन्ही दिवशी पडताळणी केली असता, लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.
लाच मागितल्यानंतर मात्र तलाठय़ाने ती पुढे स्वीकारली नाही. अखेर 29 रोजी कराड शहर पोलीस ठाण्यात लाच मागणीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने दाखल करण्यात आली. गुन्हा दाखल झाल्यानंतर तलाठी पाटील याला या विभागाने अटक केली.































































