कराड – वाठारजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाठार येथे पुणे-बंगळुरू महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाला. वाहनाच्या धडकेत जखमी झालेला बिबट्या मृतावस्थेत आढळला. स्थानिक ग्रामस्थांनी याबाबतची माहिती वनविभागाला कळवल्यानंतर वनविभागाच्या पथकाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचानामा केला.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, तालुक्यातील वाठारजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर एका बिबट्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्या गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला. महामार्गावर बिबट्या मृतावस्थेत आढळल्याने महामार्गावरील प्रवाशांसह स्थानिक ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला कळवली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचानामा केला. तसेच घटनेतील मृत बिबट्या हा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर मृत बिबट्यावर वनविभागाच्या हद्दीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

बिबट्याच्या डाव्या बाजूच्या शरीरावरील कंबरेवर जोरात कोणत्या तरी अज्ञात वाहनाने जोरात धडक बसल्याने मोठ्या प्रमाणावर अंर्तगत रक्तस्त्राव झाले असल्याचे शवविच्छेदनामध्ये स्पष्ट झाले आहे. बिबट्याचे सर्व अवयव, मिश्या, सर्व नखे , सर्व दात हे सुस्थितीत होते.

सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनपाल सावखंडे, वनपाल बाबुराव कदम, वनरक्षक अरुण सोळंकी, रमेश जाधवर, अश्विन पाटील, आदी वनकर्मचारी यांच्या उपस्थितीत बिबट्याचे दहन करण्यात आले.