
सामना प्रतिनिधी । संगमेश्वर
कार्तिक महिन्याच्या प्रारंभी रानफुलांचा बहर कमी होवून थंडीच्या हंगामात दवावर बहरणाऱ्या फुलांचा हंगाम सुरु होतो. असे असले तरी याला पावसाळ्यात उमलणाऱ्या कुरडूच्या फुलांचा अपवाद असून ही फुले कार्तिक महिन्याच्या अखेरीपर्यंत आपला बहर आणि अस्तित्व टीकवून ठेवतात. हिरव्या जाळ्यांमधून कुरडूच्या अप्रतिम फुलांचे पसरलेले गालीचे निसर्गाच्या सौंदर्यात मोलाची भर घालत असतात. कुरडू या फुलाला जरी गंध नसला तरी त्यामध्ये असणारा टीकाऊपणाच्या गुणधर्माने या फुलाला मोठे धार्मिक महत्व प्राप्त करुन दिले आहे. नवान्न पोर्णिमेला घरोघरी बांधल्या जाणाऱ्या नव्यात कुरडूच्या फुलाला स्थान देण्यात आले आहे. कुरडूच्या फुलाला असलेले धार्मिक महत्व लक्षात घेता रानफुलात कुरडूचीच वट असे म्हणावे लागते.
स्पर्श केल्यास कुरडूचे फुल हे कृत्रिम वाटते. निसर्गाने या फुलाला सौंदर्य दिले असले तरी, त्यामध्ये नाजूकते ऐवजी टीकाऊपणा भरभरून दिला आहे. साधारण तीन इंचा पर्यंत उंच होणाऱ्या या फुलाला जराही गंध नसतो. असे असले तरी त्यामध्ये असणारा कणभर मध प्राशन करण्यासाठी मधमाशा आणि फुलपाखरे कुरडू भोवती रुंजी घालत असतात. मोती रंगाची ही फुले नंतर तांबूस जांभळी आणि फिक्कट जांभळी होतात. या फुलाचे आयुष्य सहा महिन्यांपर्यंत असल्याने याला नवान्न पोर्णिमेला बांधल्या जाणाऱ्या नव्यात स्थान देण्यात आले आहे. या फुलाचे अंग नाजूक नसल्यानेच याला मोठे आयुष्य लाभले आहे. कुरडूला स्पर्श केला असता ही फुले कृत्रिम वाटतात याचाच अर्थ टीकाऊपणासाठी निसर्गानेच या फुलाला तसे कवच दिले आहे.
पावसाळ्यात शेतांच्या बांधांसह मोकळ्या शिवारात मोठ्या प्रमाणावर कुरडू उगवतो. हे एक प्रकारचे गवतच असल्याने त्याची दरवर्षी अन्य गवता बरोबरच भरमसाठ वाढ होत असते. मात्र एकदा का कुरडू फुलायला लागला की, अन्य गवतामधून त्याचे वेगळेपण फुलांच्याद्वारे आपोआप दिसू लागते. कुरडूला फुले येवू लागली की अगदी कार्तिक महिन्या पर्यंत हा बहर कायम असतो. पावसाळा संपून हिवाळा सुरु झाल्यावर रानफुले अंतर्धान पावतात. मात्र टीकाऊ कुरडू आपले अस्तित्व हिवाळ्यातही टीकवून ठेवतो. सध्या तर सर्वत्र हिरव्या जाळ्या कुरडूच्या फुलांनी बहरल्याने सर्वत्र याचे गालीचे पसरल्याचे दृष्य दिसून येत आहे.

































































