उधारीवर घेतलेल्या लॉटरी तिकिटावर जिंकले 6 कोटी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुणाचं नशीब कधी पालटेल हे सांगता येत नाही. उधारीवर घेतलेल्या लॉटरी तिकिटावर केरळमधील एका व्यक्तीला चक्क सहा कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे. पी. के. चंद्रन या व्यक्तीसोबत हा प्रकार घडला आहे. रविवारी सकाळीच त्यांनी हे तिकीट राखून ठेवायला सांगितले अन् संध्याकाळी याच तिकिटावर ते करोडपती झाले आहेत.

कोचीमधल्या अलुवा शहरातील एका रुग्णालयाजवळ 37 वर्षीय समिजा या आपल्या पतीसोबत लॉटरीचा स्टॉल चालवतात. केरळ सरकारच्या समर बंपर लॉटरीची 12 तिकिटे त्यांच्याकडे शिल्लक होती. नेहमीच्या ग्राहकांना त्यांनी फोन करून या तिकिटांबद्दल सांगितले. तेव्हा पी. के. चंद्रन यांनी समिजाला शेवटी 6142 असा क्रमांक असलेले लॉटरीचे तिकीट राखून ठेवायला सांगितले. तिकिटाचे 200 रुपये तुला नंतर देतो असे तिला म्हणाले. त्याच दिवशी संध्याकाळी जाहीर झालेल्या लॉटरीच्या निकालात या तिकिटाला पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. लॉटरी एजंट यांनी प्रामाणिकपणा दाखवत ते तिकीट चंद्रन यांच्याकडे सुपूर्द केले. सध्या समिजा यांच्या प्रामाणिकपणाची सर्वत्र चर्चा आहे. अनेक जण फोन करून त्यांचे काैतुक करत आहे.