विकी त्याचं नाकही खाजवू शकत नाही का? ‘त्या’ व्हिडीओवर करण जोहरचा सवाल

निर्माता दिग्दर्शक करण जोहर बऱ्याचदा वादात अडकत असतो. काही दिवसांपूर्वी त्याच्या घरी झालेल्या एका पार्टीवरही असाच वाद निर्माण झाला होता. पार्टीमध्ये सामील झालेल्या कलाकारांनी अमली पदार्थांचं सेवन केल्याचा आरोप शिरोमणी अकाली दलचे आमदार मनजिंदर सिरसा यांनी केला होता. त्यावर करण जोहरने कोणतीही प्रतिक्रिया देण्याचं टाळलं होतं. पण आता मात्र त्याने या आरोपांचं खंडन करण्यासाठी एक प्रश्न विचारला आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत करणने खुलासा केला आहे. सिरसा यांनी केलेल्या आरोपांचं खंडन करत त्याने म्हटलं की, जर त्या पार्टीत ड्रग्ज घेतले गेले असते तर मी त्याला रेकॉर्ड करून ऑनलाईन शेअर का करेन. मी उलट असा काही व्हिडीओ बनवलाच नसता. तिथे उपस्थित असलेले सगळेजण हे बॉलिवूडमधले यशस्वी लोक होते, जे कठोर परिश्रम केल्यानंतर नाईट आउट पार्टी एन्जॉय करत होते. त्या व्हिडीओत आक्षेपार्ह असं काहीही नव्हतं, असं स्पष्टीकरण करणने दिलं आहे.

व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या अभिनेता विकी कौशल याच्या नाक खाजवण्याच्या कृतीमुळे अंमली पदार्थाचं सेवन केल्याचा आरोप होत होता. त्यावर खुलासा करताना करण म्हणाला की, तुम्ही तुमचं नाकही खाजवू शकत नाही का? तुम्ही तुमच्या फोनला पँटच्या मागच्या खिशात ठेवू शकत नाही का? एखाद्या प्रकाशाचा झोत पावडरीसारखा कसा काय दिसू शकतो? असे प्रश्न करणने विचारले आहेत. विकी त्यावेळी डेंग्यू तापातून बरा होत होता आणि लिंबू पिळलेलं गरम पाणी पित होता. माझी आईही तो व्हिडीओ बनवण्याच्या पाच मिनिटं आधीपर्यंत त्या पार्टीत उपस्थित होती. आम्ही मित्र मिळून संध्याकाळची मजा लुटत होतो. गाणी ऐकत होतो, चविष्ट जेवण जेवत होतो, गप्पा मारत होतो, पण जे आरोप झालेत तसं काहीही तिथे झालं नाही, असं करणने स्पष्ट केलं आहे.

असे आरोप अत्यंत निराधार आहेत. मी अशा आरोपांकडे कानाडोळा करणार नाही. असा आरोप झाला तर पुढच्यावेळी कायद्याची मदत घेईन. तुम्ही तुमच्या विचारांनुसार आमच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवू शकत नाही, असा इशाराही करणने दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या