कर्जतमधील 60 गावांचा जीव पुलावर टांगणीला; पुलावरून हजारो धोकादायक प्रवाशांची ये-जा, खड्ड्यांचे साम्राज्य, तुटलेले सुरक्षा रेलिंग

नेरळ-कळंब मार्गावरील दहिवली पूल धोकादायक ठरवण्यात आला आहे. पुलावर खड्डयांचे साम्राज्य पसरले असून सुरक्षा रेलिंगही तुटले आहेत. त्यामुळे कर्जतमधील ६० गावांतील गावकर्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याबाबत अनेकदा आवाज उठवूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धोकादायक पुलावर प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.

मालेगाव, कोदिवले, बिरदोले, अवसरे, पोशीर यांसह ५० हून अधिक पाडयांना जोडणारा दहिवली पूल हा महत्त्वाचा दुवा आहे. मात्र हा पूल कमकुवत झाला आहे. पूल खूप जुना असल्याने त्यातील दगड खिळखिळे झाले आहेत. त्यामुळे वाहतूक बंद पडू शकते. अनेक छोट्या-मोठ्या पाड्यांचा, गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. पुलावर असंख्य खड्डे पडले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परिस्थिती झाली आहे. या पुलावरून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरीही काही बेशिस्त वाहनचालक अवजड वाहनांची वाहतूक करीत आहेत. लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती न केल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

नवीन पुलाचे काम महिनाभरापासून ठप्प

दहिवली पुलाशेजारी नवीन पुलाचे काम सुरू झाले आहे. मात्र हे काम गेल्या महिन्यांपासून ठप्प आहे. उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली की जुन्या पुलावरून पुराचे पाणी जाते. त्यामुळे वाहतूक ठप्प होते. यावर्षी तब्बल तीन वेळा वाहतूक बंद करण्यात आली. पाण्यामुळे पुलावर खड्डेच खड्डे झाले आहेत. येथून ये-जा करताना वाहनचालकांच्या नाकीनऊ आली आहेत. बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.