खासगी सावकारकी विरोधातील ‘कर्जत पॅटर्न’ ठरतोय दिशादर्शक, 22 गुन्हे दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खासगी सावकारकीविरुद्ध कर्जत पोलिसांनी राबवलेली मोहीम नगर जिह्यासाठी दिशादर्शक ठरली आहे. गेल्या वर्षभरात कर्जत तालुक्यातील जुलमी खासगी सावकारकीचे कंबरडे मोडून नागरिकांची पिळवणूक थांबण्यास मदत झाली आहे. तालुक्यातील 22 प्रकरणांतील 12 प्रकरणांत सावकारांवर गुन्हे दाखल झाले आहेत, तर 10 प्रकरणांत तडजोड करण्यात यश आले आहे.

कायम दुष्काळी म्हणून गणना असलेल्या कर्जत तालुक्यात सावकारकी मोठय़ा प्रमाणात फोफावली आहे. अनेक मातब्बर मंडळी खासगी सावकारकीच्या धंद्यात पाय रोवून उभी होती. टक्केवारीच्या मनमानी आकडय़ात अन् चक्रवाढ व्याजात अनेकांच्या जमिनी व आयुष्यभराची कमाई गेली आहे. सावकारांकडून पैशांसाठी होत असलेला कौटुंबिक अत्याचार, मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान यात अनेक कुटुंबांची वाताहत झाली.

कर्जत विभागाचे पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव व वर्षभरापूर्वी कर्जतच्या पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सावकारकीची पाळेमुळे खणून काढली. सावकार व सावकारकी विरोधात नागरिकांना आवाहन करून अभय दिले.

सोशल मीडियावर प्रभावी जनजागृती केली आणि वर्षभरात सावकारकीच्या तब्बल 22 तक्रारी पोलीस ठाण्यात आल्या. यातील 10 प्रकरणांत परस्पर तडजोड होऊन केवळ मुद्दल घेण्याच्या अटीवर तडजोडी झाल्या, तर 12 प्रकरणांत सावकारांवर गुन्हे दाखल केले. याद्वारे एकूण 1 कोटी 87 लक्ष 1 हजार रुपयांची मालमत्ता संरक्षित करण्यात पोलिसांना यश आले. कर्जत पोलिसांनी केलेल्या धाडसी कारवाया आणि अवघड तपासामुळे पोलीस अधीक्षक सौरभ पाटील यांच्या वतीने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव व त्यांच्या टीमला गौरविण्यात आले आहे.