
कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने गुरुवारी आपल्या 13 उमेदवारांची यादी जाहीर केली. हे सर्व उमेदवार काँग्रेस आणि जेडीएसचे बंडखोर अपात्र आमदार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दुसऱयाच दिवशी म्हणजेच गुरुवारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. न्यायालयाने बुधवारी त्यांना अपात्र ठरवताना विधानसभेची पोटनिवडणूक लढवण्यास मुभा दिली होती.
भाजपच्या उमेदवार यादीत के. सुधाकर, बी. सी. पाटील, शिवराम हेब्बर, आनंद सिंह, एस. टी. सोमशेखर यांच्यासह इतर काही नेत्यांची नावे आहेत. राज्यात 5 डिसेंबरला विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवलेल्या 17 बंडखोर आमदारांपैकी शिवाजीनगरमधील काँग्रेसचे आमदार आर. रोशन बेग हे वगळता इतर 16 जणांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, भाजप प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कातील आणि प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस पी. मुरलीधर राव यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर लगेचच पक्षाने यातील 13 बंडखोरांना पोटनिवडणुकीचे तिकीट देत आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली.
आर. रोशन बेग यांच्यावर घोटाळ्याचा कलंक
काँग्रेसचे अपात्र आमदार आर. रोशन बेग यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याबाबत पक्षश्रेष्ठाr राजी नसल्याचे वृत्त आहे. बेग यांच्या विरोधात ‘आयएमए पोंजी’ घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. विशेष म्हणजे सात वेळा आमदार राहिलेल्या बेग यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करण्यास तयारी दाखवली होती.
























































