
कर्नाटक विधानसभेच्या 15 जागांसाठी 21 ऑक्टोबरला घेण्यात येणाऱ्या पोटनिवडणुकीस निवडणूक आयोगाने स्थगिती दिली आहे. विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविलेल्या आमदारांच्या याचिकेवरील सुनावणी अद्याप पूर्ण झालेली नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे.
काँग्रेस-जेडीएसच्या 17 आमदारांनी कुमारस्वामी सरकारविरोधात बंड पुकारत कर्नाटकात भाजप सरकार येण्यास मदत केली होती. विश्वासदर्शक ठरावावेळी व्हीप नाकारणाऱया या आमदारांना विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी विधानसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत पक्षांतरबंदी कायद्यानुसार अपात्र ठरवल्यामुळे या बंडखोरांना 2023 पर्यंत विधानसभेची पोटनिवडणूक लढविता येणार नाही. यासंदर्भात अपात्र आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या याचिकेवर आता 22 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

























































