बोम्मईंची उलटी बोंब, सीमावाद महाराष्ट्राने निर्माण केला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीमा भागातील मराठी बांधवांवर दडपशाही चालवणाऱया कर्नाटक सरकारची मुजोरी कायम आहे. सीमाप्रश्नी जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेले असतानाही आज कर्नाटकातील भाजपच्या बोम्मई सरकारने विधानसभेत महाराष्ट्राविरुद्ध ठराव संमत केला. ‘सीमाप्रश्न महाराष्ट्राने निर्माण केला आहे. त्याचा आम्ही निषेध करत आहोत. राज्याच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे’, असे या ठरावात नमूद करण्यात आले असून या माध्यमातून महाराष्ट्राला डिवचण्याचे काम कर्नाटकने केले आहे.

बेळगाव येथे कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असून आज विधानसभेत सीमाप्रश्नी चर्चा झाली. त्यानंतर सभागृहाने एकमुखाने महाराष्ट्राविरुद्ध ठराव संमत केला. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सभागृहात ठरावाची सूचना मांडली. त्याला विरोधी पक्षनेते सिद्धारामय्या यांनीही पाठिंबा दिला.

महाराष्ट्रातील नेत्यांवर कारवाईची धमकी

महाराष्ट्रातील नेत्यांचाही बोम्मई यांनी निषेध केला व कारवाईची धमकी दिली. महाराष्ट्रातील काही नेते प्रक्षोभक विधाने करत असून ही विधाने थांबली नाहीत तर आम्हाला कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलावे लागेल, अशी धमकी त्यांनी दिली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर बोलताना बोम्मई यांची जीभ घसरली. त्यांचा उल्लेख त्यांनी चीनचे एजंट असा केला. कृष्णेच्या पाण्यावरून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही टीका केली. कृष्णेचे पाणी देणे किंवा न देणे हे महाराष्ट्राच्या हातात नसून ती देशाची संपत्ती आहे. पाणी आणि वारा कुणीही रोखू शकत नाही, असे बोम्मई म्हणाले. संविधान, हक्क आणि मर्यादा याबाबत आम्ही पूर्ण सजग आहोत आणि महाराष्ट्राला योग्यवेळी उत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

‘ज्यावेळी भाषावार प्रांतरचना झाली त्याचवेळी राज्यांच्या सीमा निश्चित झाल्या आहेत आणि कर्नाटककडून तरी महाराष्ट्रासोबत कोणत्याही प्रकारचा सीमावाद नाही. न्या. महाजन समितीच्या शिफारशी अंतिम असून आमच्यासाठी हा मुद्दा मिटलेला आहे’, असे या ठरावात नमूद करण्यात आले आहे.
कर्नाटकची एक इंचही जमीन कुणाला देणार नाही. त्यासाठी काहीही करावे लागले तरी बेहत्तर, असा इशारा पुन्हा बोम्मई यांनी दिला.
कर्नाटकचा भूभाग, पाणी, भाषा आणि कन्नडीगांच्या हितांशी कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही. राज्याच्या हिताच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे नमूद करतानाच महाराष्ट्राच्या बाजूने हा वाद उगाचच निर्माण करण्यात येत आहे, असा आरोपही करण्यात आला.

इंच न् इंच जागा घेणारच, अजित पवार यांनी ठणकावले

मी अगोदरच सांगितलं आहे की जेवढी जागा मराठी माणूस म्हणतोय की, आमच्याकडे आली पाहिजे, तो भाग महाराष्ट्रात आला पाहिजे ती इंच न् इंच जागा आम्ही घेणार, ते काय नाही देणार त्यांच्या हातात काय आहे? देवळातली घंटा आहे का वाजवायची? अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कर्नाटक सरकारला ठणकावले.