डॉक्टरांनी माणसाच्या पोटातून काढली 1.2 किलोची 187 नाणी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

लहान बाळाने एखादे नाणे गिळल्याच्या घटना आपण अनेकदा पहिल्या असतील. बाळाने नाणे गिळल्यानंतर पालकांची मात्र मोठी तारांबळ उडते. परंतु कर्नाटकातील एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे एका 58 वर्षीय व्यक्तीच्या पोटातून तब्बल 187 नाणी काढण्यात आली आहेत. पोटात तीव्र वेदना आणि उलट्या होत असल्याने या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी एंडोस्कोपी चाचणी केली. यावेळी रुग्णाच्या पोटात नाणी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अखेर ऑपरेशननंतर रुग्णाच्या पोटातून एक, दोन आणि पाच रुपयांची तब्बल 187 नाणी काढण्यात आली.

ज्या व्यक्तीच्या पोटातून ही नाणी काढण्यात आली आहेत, तो पूर्वी स्किझोफ्रेनियाचा रुग्ण होता. पोटातून काढलेल्या या 187 नाण्यांची किंमत एकूण 462 रुपये होती. दयाप्पा हरिजन असे या 58 वर्षीय व्यक्तीचे नाव असून तो रायचूर जिल्ह्यातील लिंगसुगुर शहरात राहतो.

26 नोव्हेंबर रोजी दयाप्पा यांना पोटात दुखू लागले. त्यानंतर दयाप्पा यांचा मुलगा रवी कुमार याने त्यांना एस निजलिंगप्पा मेडिकल कॉलेजच्या बागलकोट कॅम्पसमधील एचएसके रुग्णालयात दाखल केले. लक्षणांच्या आधारे तेथील डॉक्टरांनी एन्डोस्कोपी आणि एक्स-रे केले. यानंतर रुग्णाच्या पोटाच्या स्कॅनमध्ये नाणे असल्याची खात्री झाल्यानंतर ऑपरेशनचा निर्णय घेण्यात आला. पोटातून काढलेल्या 187 नाण्यांचे एकूण वजन 1.2 किलो एवढे आहे.

डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे दयाप्पा यांना स्किझोफ्रेनिया आजार असून त्यांना नाणी गिळण्याची सवय आहे. स्किझोफ्रेनिया असलेले रुग्ण असामान्य विचार करतात आणि तसे वागतात. दयाप्पा यांनी गिळलेल्या 187 नाण्यांमध्ये एक रुपयाची 80 नाणी, दोन रुपयांची 51 नाणी आणि पाच रुपयांची 56 नाणी होती.

याबद्दल दयाप्पा यांच्या मुलाने सांगितले की, “वडील मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असले तरी रोजची कामं करायचे. नाणी गिळल्याचे त्यांनी कधी घरी सांगितले नाही. अचानक पोटात दुखू लागल्यावर त्यांनी आम्हाला सांगितले, पण त्यावेळीही नाणी गिळल्याचे सांगितले नाही.