कर्नाटकात भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाचा खून, आरोपीला पुण्यातून बेड्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्ववैमनस्यातून भाजपच्या माजी जिल्हाध्यक्षाचा तिघांनी मिळून कर्नाटकातील गुलबर्गा येथे खून केला. त्यानंतर तिघेही पसार झाले. यातील एक आरोपी पुण्यात असल्याची माहिती काढून पुणे पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाने आरोपीला मंगळवार पेठेतून अटक केली. त्याला कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

मयूर लक्ष्मण खेत्रे (26, रा. मंगळवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, अजित मलिनात छत्री (27, रा. सर्साबा, आळंद, गुलबर्गा), आकाश उर्फ आण्णा लालसिंग कमाटी (27, रा. मंगळवार पेठ) या दोघांवर गुन्हा दाखल असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तर, महांतप्पा सिद्रामप्पा आलुरे (47, रा. आळंद, कलबुर्गी) असे खून झालेल्याचे नाव आहे. गुरुवारी (दि.29) ही घटना घडली होती. याप्रकरणी गुलबर्गा येथील मादन हिप्परगा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल आहे.

यातील छत्री हा मुख्य आरोपी असून तो गुलबर्गा येथीलच रहीवासी आहे. छत्री आणि आुलरे यांचे वाद होते. यातूनच त्याने आलुरे यांना मारण्याचा प्लॅन रचला. त्यासाठी त्याने पुण्यातील त्याचा नातेवाईक खेत्रे याच्यासह कमाटी याला गुलबर्गा येथे बोलावून घेतले. गुरुवारी गुलबर्गातील सरसांबा येथे आलुरे यांना अडवून त्यांच्यावर सपासप वार केले. यातच आलुरे यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी गुलबर्गातून सोलापूरमार्गे पसार झाले.

तांत्रिक तपासावरून यातील एक आरोपी हा मंगळवार पेठेत असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानूसार सहायक निरीक्षक राजेश माळेगावे, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, अंमलदार प्रदीप शितोळे, सुरेंद्र जगदाळे, सचिन अहीवळे, तुषार भिवरकर यांच्या पथकाने आरोपी खेत्रे याला मंगळवार पेठेतून ताब्यात घेतले. पुढील तपासासाठी त्याला कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली.