माजी मंत्र्याचे KGF ला जात असताना अपहरण, 48 लाखांची खंडणी उकळल्यानंतर केली सुटका

कर्नाटकचे माजी मंत्री वरथूर प्रकाश यांचं बंगळुरू शहरात अपहण करण्यात आलं होतं. 25 नोव्हेंबरला त्यांना 8 जणांना पकडलं आणि अपहरण केलं. प्रकाश यांना 3 दिवसांनंतर होस्कोटे इथे सोडून देण्यात आलं. त्यांच्या सुटकेसाठी खंडणी मागण्यात आली होती. प्रकाश यांच्या मित्राने अपहरणकर्त्यांनी सांगितल्याप्रमाणे 48 लाख रुपये दिल्यानंतर प्रकाश यांना अपहरणकर्त्यांनी सोडून दिलं.

प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना आणि त्यांच्या चालकाला 8 जणांनी अडवून अपहरण केलं होतं. प्रकाश हे कोलार गोल्ड फिल्डमधील त्यांच्या फार्महाऊसवर जात असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं. प्रकाश यांना एका अज्ञात स्थळी नेण्यात आलं होतं. तिथे त्यांचा छळही करण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर प्रकाश घरी आले आणि त्यांनी बेलांदूर पोलिसांत तक्रार दाखल केली.

अपहरणकर्त्यांनी प्रकाश यांच्या सुटकेसाठी 30 कोटींची खंडणी मागितली होती. प्रकाश ही रक्कम देण्यासाठी तयार नव्हते, मात्र त्यांना मारहाण करण्यात आल्यानंतर ते 48 लाख रुपयांच्या खंडणीसाठी तयार झाले. प्रकाश यांनी त्यांचा मित्र नायाज याला पैसे अपहरणकर्त्यांना द्यायला सांगितले होते. हे पैसे मिळाल्यानंतरही अपहरणकर्त्यांनी प्रकाश आणि त्यांच्या चालकाचा छळ केला होता. या छळामुळे प्रकाश यांचा चालक बेशुद्ध पडला होता. त्यानंतर या दोघांना अपहरणकर्त्यांनी सोडून दिले.

प्रकाश यांच्या अपहरणानंतर पोलिसांनी २ विशेष पथके तयार केली होती. पोलीस आयुक्त डी.देवराज यांनी अपहरणाबाबत बोलताना म्हटलं होतं की अपहरणकर्ते हे तोंडावर मास्क बांधून आले होते त्यामुळे त्यांची ओळख पटवणं कठीण झालं आहे. ज्या गाडीतून हे अपरहणकर्ते आले होते त्या गाडीची सीसीटीव्ही दृश्ये मिळतायत का आणि त्याद्वारे काही धागेदारे हाती लागतायत का याचा पोलीस सध्या तपास करत आहेत.

प्रकाश यांनी दोनवेळा अपक्ष म्हणून आमदारकीची निवडणूक जिंकली होती. ते कोलार मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत होते. 2012 ते 2013 या एका वर्षासाठी त्यांनी भाजपच्या सरकारमंत्री मंत्रीपदही भूषवलं होतं. 2017 मध्ये प्रकाश यांनी नम्मा काँग्रेस नावाचा स्वत:चा पक्ष सुरू केला होता. आपल्या पक्षातर्फे 2018 ची विधानसभा निवडणूक लढवत असताना प्रकाश यांचा पराभव झाला होता.

आपली प्रतिक्रिया द्या