महाराष्ट्रातून येणारे सर्व मार्ग कर्नाटक सरकारने रोखले; कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने,महाराष्ट्रातुन येणाऱ्यांचा सर्व बाजुंनी प्रवेशच रोखला आहे. कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सीमाभागातील गावागावाच्या वेशीवर खंदक खोदण्यात आले आहेत. तसेच नदी-नाल्यावरील पुलांवरही मोठे काटेरी वृक्ष पसरवत प्रवेश करणाऱ्यांना रोखले आहे. त्यामुळे सीमाभागातील शेतकऱ्यांसह स्थानिकांसमोरही अडचणी निर्माण झाल्या आहेत.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात इतर राज्यांतून प्रवेश करणाऱ्या नागरिकांसाठी कोविड तपासणी केंद्राची सुविधा करण्याऐवजी कर्नाटक सरकारने गेल्या महिनाभरापासून थेट प्रवेश बंदीच केली आहे. पूणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी टोल नाका येथून कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनधारकांना कोरोना निगेटिव्ह अहवाल दाखविल्याशिवाय प्रवेश देण्यात येत नाही. त्यामुळे कोविड तपासणी अहवालासाठी कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयावर ताण पडत होता.

आता तर कर्नाटकात प्रवेश करणाऱ्या महाराष्ट्रातील सीमाभागातील गावांतून होणारे प्रवेशही आजपासून बंद करण्यात आले आहेत. काही गावांतील रस्त्यावर खंदक खोदण्यात आले आहेत. तर नदी,नाल्यावरील पुलावर काटेरी झुडपे टाकून प्रवेश बंद करण्यात आला आहे. फक्त आरटीपीसीआर चाचणी करून निगेटिव्ह अहवाल असलेल्यांनाच राष्ट्रीय महामार्गावरून प्रवेश देण्यात येत आहे.